खेड-शिवापूर टोलनाक्यावर टोलचे पैसे देण्याच्या वादातून येथील कर्मचाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. या मोटारीत एकूण पाच व्यक्ती असून त्यातील निष्पन्न झालेले दोघे सराईत गुन्हेगार आहेत. या घटनेत जखमी झालेला कर्मचारी सुरेश बाळू खोमणे (वय २५, रा. धागवडी, ता. भोर) याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. राजगड पोलीस आणि पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर आहेत.
साताऱ्याकडून पांढऱ्या रंगाच्या मारुती स्वीफ्ट (एमएच१२- जे झेड ०४५०) यातील पाच जण पुण्याकडे येत होते. खेड शिवापूर टोलनाक्यावर आल्यानंतर टोल मागितल्यावरून येथील कर्मचाऱ्यांची वादावादी केली. टोल न देताच पुढे गेले असता त्यातील एकाने मोटारीतून उतरून खोमणे यांच्यावर गोळी झाडली. मोटारीतून सगळे पुण्याच्या दिशेने निघाले. पोलिसांनी त्यांचा कात्रज दूध डेअरीपर्यंत पाठलाग केला. मात्र, आरोपी चकवा देऊन पसार झाले होते. खोमणे यांना तत्काळ भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. खोमणे यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले, की टोल नाक्यावर गोळीबार करणाऱ्या मोटारीतील पाच पैकी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. जखमी कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर आहे. गुन्ह्य़ात वापरलेल्या मोटारीने साताऱ्याकडे जातानाही टोल भरलेला नव्हता. येताना टोलवरून देण्यावरून वादावादी झाली. त्या वेळी आरोपींनी दोन गोळ्या झाडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. मात्र, पोलिसांना घटनास्थळी एकच पुंगळी मिळाली असून जखमीला ही एकच गोळी लागली आहे. मोटारीचा क्रमांक सीसीटीव्ही चित्रीकरणात आला असून त्यावरून मोटारीच्या मालकाची माहिती मिळाली आहे. आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक केली जाईल.