पुणे : ‘प्रशासनातील प्रथम वर्ग अधिकाऱ्यांकडे ‘एलिट’ क्लास म्हणून पाहिले जाते. मात्र, ते लोकसेवक आहेत. त्यांच्याकडून लोकांची सेवा केली जाते का, हा प्रश्न पडतो. राज्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी मालकीच्या भावनेने राज्य करणे म्हणजे लोकशाही नसते,’ असे मत देशाचे पहिले माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्लाह यांनी सोमवारी व्यक्त केले.
‘सरहद पुणे’च्या वतीने देशाचे माजी गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सुशासन : कल्पना की वास्तव’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हबिबुल्लाह बोलत होते. राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ‘सरहद’चे संजय नहार, लेशपाल जवळगे या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात प्रकाश पोळ, सुहास मापारी, प्रतिभा भराडे या अधिकाऱ्यांसह सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांना सन्मानित करण्यात आले.
‘माहिती आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारताना सुरुवातीला काय काम करायचे, हा प्रश्न होता. मात्र, लोकांना प्रशासनाची आणि त्याही पलीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही शासनाच्या कामकाजाची माहिती नसल्याचे, सचिवालयातही भ्रष्टाचार असल्याचे निदर्शनास आले,’ अशी आठवण हबिबुल्लाह यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘मुघल इथलेच होते.
ते भारताचे बादशहा म्हणवून घेत. त्यांच्या प्रशासनात हिंदूंचाही मोठा सहभाग होता. इतिहासकारांमध्ये यावरून वाद होतील. मात्र, आता हिंदू-मुस्लिम करण्याची गरज आहे का, असा सवाल उपस्थित होतो. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रशासन चालवायला हवे. लोकशाहीचे यश लोकसहभागावर अवलंबून असते. त्यामुळे लोकांनीच सुशासनासाठी, प्रशासनातील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करायला हवा. वेळप्रसंगी माहिती अधिकाराचा वापर करत प्रशासकांना जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी.’
‘पारदर्शकतेच्या क्रमवारीत खालच्या क्रमांकावर असलेला आपला देश भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत अव्वल असतो. ‘इज ऑफ ड्युइंग बिझनेस’चा विचार करता कोणत्याही उद्योजकाला या देशात व्यवसाय करण्याची इच्छा होत नसल्याचे चित्र आहे. केवळ सुशासनाद्वारेच ही परिस्थिती बदलू शकते. प्रशासनात नैतिकता, गुणवत्ता, अंमलबजावणी आणि पारदर्शकता हे गुण महत्त्वाचे असतात. सुशासनात लोकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते,’ असे डॉ. करीर म्हणाले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
‘वो कश्मीर कभी देख पायेंगे’
‘फाळणी काळात नागरिकांना घरदार सोडावे लागले. रक्तपात झाला. फाळणीपूर्वी काश्मीरमध्ये शांतता होती. सगळीकडे प्रेमाचे, अहिंसेचे वातावरण होते. आता मात्र ‘वो कश्मीर कभी देख पायेंगे’, अशी खंत वजाहत हबिबुल्लाह यांनी व्यक्त केली. ‘नव्वदच्या दशकात काश्मिरी पंडितांचे मोठे स्थलांतर झाले. त्यात पाकिस्तानचा हात होता. काश्मीरच्या समस्येला हिंदू-मुस्लिम वादाचे रूप देण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, स्थानिकांना विश्वासात घेऊन पंडितांना वाचवण्यात आमचे प्रशासन कमी पडले,’ असे ते म्हणाले.