पुणे शहरातील नैसर्गिक ओढे, नाल्यांवर झालेली अतिक्रमणे, प्रवाह बदलल्यानेच शहरात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती ओढवल्याचे समोर आले आहे. तसेच पावसाळी गटार वाहिन्यांत मोठ्या प्रमाणात माती, गाळ साचला असल्याने त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमताच कमी झालेली आहे. याशिवाय शहरातील नदीपात्रामध्ये राडारोडा टाकून नदीचे पात्र आकुंचित करण्याचे उद्योग सुरू असतानाच, आता पूररेषाही नदीच्या बाजूला नेल्या जात आहेत. अशा विविध कारणांमुळे शहरात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती ओढवत आहे.

हेही वाचा >>> पुणे : पावसाच्या दणक्यानंतर आता वाहन विम्यासाठी धावाधाव

सोमवारी (१७ ऑक्टोबर) रात्री शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसाळी गटार वाहिन्यांमधून पाण्याचा निचरा पुरेशा प्रमाणात न झाल्याने रस्त्यांवर पाणी आले होते. विकासाच्या नावाखाली शहरातील नैसर्गिक ओढे, नाल्यांचे प्रवाह बदलण्यात आले आहेत. धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर नदीकाठच्या नागरिकांना धोका संभवतो.

याबाबत बोलताना जलदेवता सेवा अभियानचे संस्थापक शैलेंद्र पटेल म्हणाले, की जलसंपदा विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए) आणि महापालिका यांच्याकडील नकाशांमध्ये ओढे, नाले दिसतात. मात्र, ते केवळ नकाशावरच असून प्रत्यक्षात त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. तसेच शहराच्या विकास आराखड्यात बदल केले आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठा विसर्ग सांडपाणी वाहिन्या किंवा पावसाळी गटार वाहिन्यांमधून पुढे नदी, ओढे, नाल्यांमध्ये जाऊ शकत नाही, हीच सर्वात मोठी अडचण आहे. त्यावर ठोस उपाय म्हणून जलसंपदाकडील जुने नकाशे विकास आराखड्यात पुन्हा आरेखित करून संरक्षित केले पाहिजेत. याबाबत गेल्या तीन वर्षांपासून मी स्वत: पाठपुरावा करत आहे.

हेही वाचा >>>पुणे : चोरीचा जाब विचारल्याने दुकानदाराला बेदम मारहाण ; मंगळवार पेठेतील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुण्यात शहरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. विविध कारणांमुळे चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स – एफएसआय) वाढवला जात आहे. ज्या इमारतींचा पुनर्विकास होत आहे, त्या ठिकाणी काँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय जेव्हा मोठे प्रकल्प येतात, तेव्हा सांडपाणी वाहिन्यांच्या उताराबाबत साधकबाधक विचार केला जात नाही. पुण्यातील पावसाचे प्रमाण ३३ ते ३५ टक्के पाऊस वाढणार असल्याचे भाकित आहे. हे गृहित धरूनच सांडपाणी व्यवस्थापन करायला हवे. जास्त पाऊस पडून रस्त्यांवर पाणी साचण्याला प्रशासनासह पुण्याचे नागरिकही जबाबदार आहेत. रस्त्यामधील पावसाळी गटार वाहिन्यांत काही कमतरता असेल, तर नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवणे आवश्यक आहे. अस्तित्वातील पावसाळी गटार वाहिन्यांत माती, गाळाबरोबरच प्लास्टिकही जमा झाले आहे. प्लास्टिकमुळेही सांडपाणी वाहिन्यांचे प्रवाह आक्रसले आहेत. या पार्श्वभूमीवर या समस्यांच्या निराकरणासाठी आणि समस्या येऊच नये म्हणून नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी दरमहा जनसुनवाई व्हायला हवी’, अशी अपेक्षा सागरमित्र अभियानाचे सहसंचालक विनोद बोधनकर यांनी व्यक्त केली.