अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शहरासह जिल्ह्य़ातील एक हजार ३०६ घरांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात आले आहेत. घरे बाधित झालेल्या कुटुंबांना ४७ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मात्र, पुणे शहरातील ओढे आणि नाल्यांवरील बाधित २५५ घरांचे पुन्हा सविस्तर सर्वेक्षण करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाच कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

पुणे शहरात २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी वैशाली इंदाणी, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब पडघलमल या वेळी उपस्थित होते.

शहरासह जिल्ह्य़ात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीत बाधित कुटुंबांना देण्यात येणारी मदत आणि त्यांच्या पुनवर्सनाबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना या वेळी जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. ‘अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार एक हजार ३०६ घरे बाधित झाली आहेत. मात्र, पुणे शहरातील नाले, ओढय़ांजवळील २५५ घरांचे पुन्हा सविस्तर सर्वेक्षण केले जाणार आहे. संबंधितांना मदत मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. ओढे आणि नाल्यांजवळील २५५ घरांचे नुकसान झाले आहे. पुणे महापालिकेने त्यांची नावे संकलित करून जिल्हा प्रशासनाला कळवली आहेत. मात्र, संबंधित घरे ओढे, नाल्यांजवळ असल्याने त्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) नियमानुसार मदत मिळू शकत नाही. मात्र, या नागरिकांना मदत मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याकरिता संबंधित घरांचे पुन्हा सर्वेक्षण करून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे’, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

अतिवृष्टीमध्ये ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी चारजण अद्याप बेपत्ता असून त्यांना वगळून इतर सर्वाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली आहे. तसेच अतिवृष्टीत शहरासह जिल्ह्य़ात २९६ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यापोटी २३ लाख ३२ हजार रुपयांची मदत दिली आहे. १२ गोठे बाधित झाले. गोठय़ांच्या मालकांना तीन लाख ५५ हजार रुपयांची मदत दिली आहे. बाधितांना मदतीसाठी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी ४७ लाख रुपयांचे वाटप झाले आहे, असेही कटारे यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे शहरासह जिल्ह्य़ातील बाधितांना द्यावयाच्या मदतीसाठी आणखी पाच कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. शहरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांच्या घरांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये अंशत: / पूर्णत:, पक्की / कच्ची घरे पाहिली जातील. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा हजार आणि ग्रामीण भागात पाच हजार मदत दिली आहे.

– डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी