पुणे : कृषी महाविद्यालयाजवळून साखर संकुल येथून जुन्या पुणे-मुंबई रस्त्याला जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने येथे उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या उड्डाणपुलाचा एक भाग शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळ जोडला जाणार असल्याने संगमवाडीमार्गे येरवडा तसेच मुंबई, नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना वाहतूक कोंडीत न अडकता थेट या पुलाचा वापर करता येणार आहे. सध्या नरवीर तानाजी वाडी येथे असलेल्या रेल्वे मार्गावरून हा पूल तयार केला जाणार आहे.

या उड्डाणपुलामुळे गणेशखिंड रस्त्याबरोबरच संचेती रुग्णालयाच्या चौकात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाने गणेशखिंड रस्त्यावरून साखर संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जुन्या पुणे-मुंबई रस्त्याकडे जाण्यासाठी वाय आकारातील उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन केले आहे. याची एक बाजू पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर, तर दुसरी बाजू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दिशेला उतरेल. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ एसटी स्थानक बांधले जाणार आहे. या स्थानकावरून नरवीर तानाजी वाडी येथून उड्डाणपुलावरून जाणे शक्य होणार असल्याने एसटी बसला नव्या उड्डाणपुलाचा मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली.

कृषी महाविद्यालयाकडून साखर संकुलकडे जाणारा रस्ता सुमारे ३० मीटर रुंदीचा आहे. या रस्त्याच्या डाव्या बाजूला राज्य खादी ग्रामोद्योग, भूजल आणि साखर संकुल ही शासनाची कार्यालय आहेत. या कार्यालयांच्या नवीन वास्तूंची कामे सध्या सुरू असून, रस्ता रुंदीसाठी येथे नऊ मीटर जागा सोडण्यात आली आहे. याच जागेवरून नवीन उड्डाणपुलाचे नियोजन आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जुनी वडाची झाडे आहेत. या झाडांना कोणताही धक्का न लावता हा उड्डाणपूल उभा करणे शक्य आहे. यासाठीचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार असल्याचेही गोजारे यांनी सांगितले.

वाकडेवाडीच्या ‘अंडरपास’ची रुंदी वाढविण्याचा प्रयत्नसाखर संकुल येथून पुणे-मुंबई रस्त्यावर जाताना लोहमार्ग आहे. येथे महापालिकेने अंडरपास केला आहे. तेथून लहान आकाराची वाहने ये-जा करू शकतात. हा अंडरपास अरुंद आहे. याची रुंदीदेखील वाढविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटून नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशखिंड रस्त्यावरून साखर संकुलाच्या बाजूने जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर जाण्यासाठी वाय आकारातील उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर पाठविण्यात आला आहे. – दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प, पुणे महापालिका