पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाला विज्ञानाची जोड
काशाच्या थाळीने पायाचा मसाज करून घेण्याची ‘क्रेझ’ पुणेकरांमध्ये वाढत आहे. पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत निर्मिती केलेल्या यंत्रावर दहा मिनिटांच्या अवधीत पायाचा व्यवस्थित मसाज करून ताजेतवाने करणारी किमान २५ ते ३० केंद्र शहराच्या विविध भागांमध्ये कार्यरत आहेत. एका केंद्रावर दररोज विविध वयोगटातील किमान ६० ते ७० नागरिक मसाज करून घेत असून त्यांना प्रफुल्लित झाल्याचा अनुभव येत आहे.
पूर्वी घरामध्ये काशाच्या वाटीने पायाचा मसाज केला जात असे. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जमान्यात पायाचा मसाज करण्यासाठी स्वतंत्र वेळ मिळत नाही आणि मसाज करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडे वेळ असतोच असे नाही. ही बाब ध्यानात घेऊन ‘काशाच्या थाळीने पायाचा मसाज करून मिळेल’ असे फलक ठिकठिकाणी दिसू लागले आहेत.
गेल्या महिन्यापासून अशा स्वरूपाचा मसाज करून देणारी केंद्र ही पुणेकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहेत. सदाशिव पेठ या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अगदी जवळच्या अंतरावर तीन केंद्र आहेत. सहकारनगर, धनकवडी, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, चिंचवड, वाकड अशा विविध ठिकाणी अवघ्या ३० रुपयांमध्ये पायाचा मसाज करून दिला जातो. काशाच्या थाळीला काशाची वाटी लावलेले यंत्र आम्हीच विकसित केले असल्याची माहिती दोन केंद्राच्या संचालकांनी दिली. ५० हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणारे हे यंत्र घेऊन कोणीही व्यवसाय सुरू करू शकतो. तर, याची उपयुक्तता ध्यानात घेऊन आम्ही फ्रँचायजी देण्यास सुरुवात केली असल्याचे एकाने सांगितले.
तांबे आणि शिसे यांच्या मिलाफातून काशाची निर्मिती केली जाते. जयपूरमध्ये निर्माण होणारे कासे अव्वल दर्जाचे असते. सिंगापूर येथे मसाज करणारे अशा स्वरूपाचे यंत्र पाहून आम्ही भारतीय बनावटीचे यंत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला. १२ एप्रिल रोजी हे केंद्र सुरू केले. गेल्या महिनाभरात किमान दोन हजार लोकांनी मसाज करून घेतला आहे, अशी माहिती मिहिर भिडे यांनी दिली. लोकांचा प्रतिसाद ध्यानात घेऊन सप्ताहाचे आणि पंधरवडय़ाचे सभासदत्व घेणाऱ्या व्यक्तीस आणखी एक-दोन मसाज मोफत अशी योजना सुरू केली आहे, असे भिडे यांनी सांगितले. आमची स्वत:ची काही केंद्र असून काही ठिकाणी कांस्यथाळी मसाज करण्यासाठी फ्रँचायजी दिल्या आहेत, असे मनोज निंबाळकर यांनी सांगितले.
असा केला जातो मसाज
* खुर्चीवर बसल्यानंतर यंत्र सुरू केले जाते.
* पाय स्थिर ठेवल्यानंतर पायाखालची थाळी फिरून मसाज करते.
* मसाज करण्यासाठी साजूक तूप किंवा खोबरेल तेलाचा वापर केला जातो.
* यंत्राला टायमर लावण्यात आला असून दहा मिनिटांनंतर मसाज पूर्ण झाल्यावर यंत्र फिरण्याचे थांबते.