पुणे : परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती खोटी असल्याने त्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. निवड रद्द केलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची संधी मिळण्यासाठी २००३पासून परदेशी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. त्यानुसार ७५ विद्यार्थ्यांची ३० ऑगस्ट रोजी राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. तसेच ३८ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत होते. मात्र खोटी माहिती सादर केल्याच्या कारणास्तव वर्धा येथील उल्का खोब्रागडे, गोंदिया येथील समीक्षा डोंगरे, रायगड येथील प्राची वानखेडे, पुणे येथील अथर्व कांबळे यांची निवड रद्द करण्याचे समाजकल्याण आयुक्तांनी १३ सप्टेंबर रोजी प्रस्तावित केले होते. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. निवड रद्द केलेले सर्व सर्व विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे आहेत, नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : पिंपरी : चिंचवडची जागा न मिळाल्यास महाविकास आघाडीत प्रवेश; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा अजितदादांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवड रद्द केलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी सर्वसाधारण प्रतीक्षा यादीतील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात सुशील रणवरे, मयूर थोरात, पल्लवी अमुले, रवि एवळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमधील दोन वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिष्यवृत्ती मंजूर केलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण संपल्यावर देशाची सेवा करणे, देशाला त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेणे बंधनकारक राहील. निवड केलेल्या विद्यार्थ्यांनी परदेशातील अभ्यासक्रम दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ किंवा वाढीव खर्च दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.