पुणे : खासगी रुग्णालयात मुलाच्या उपचारासाठी परदेशातून आलेल्या एका महिलेच्या गहाळ झालेल्या १५ तोळ्यांच्या दागिन्यांचा शोध लावण्यात फरासखाना पोलिसांना यश आले. महिलेने दागिने असलेली पिशवी चोरीला गेल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. सीसीटीव्ही चित्रीकरणात महिलेच्या मुलाने पिशवी रुग्णालयातील खिडकीतून टाकून दिल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या तळघराच्या परिसरातील राडारोड्यातून महिलेची पिशवी शोधून काढली.
परदेशी महिलेला दागिने असलेली पिशवी परत मिळाल्यानंतर तिने पोलिसांचे मनोमन आभार मानले. ऑस्ट्रेलियातील सादो ओमर या महिलेच्या सात वर्षांच्या मुलाला कसबा पेठेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (७ जानेवारी) सायंकाळी ओमर यांची १५ तोळ्यांची दागिने आणि कागदपत्रे असलेली पिशवी गहाळ झाली. महिलेने त्वरीत शिवाजी रस्त्यावरील कसबा पेठ पोलीस चौकीत धाव घेतली आणि पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर यांनी ओमर यांना धीर दिला.
हेही वाचा >>> शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला. कसबा पेठ परिसरात तपास सुरू केला. रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र, पोलिसांना दागिने असलेली पिशवी सापडली नाही. अखेर पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळले. तेव्हा रुग्णालयातील खिडकीतून महिलेच्या मुलाने पिशवी रुग्णालयाच्या तळमजल्यावर टाकल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले.
पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर, उपनिरीक्षक राजू पवार, हवालदार सुनील माेरे, शिपाई अनिल गायकवाड, राजाराम गाढवे इमारतीच्या तळमजल्यावर गेले. तळमजल्याचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने राडारोडा पडला होता. अंधार असल्याने पोलिसांना पिशवीचा शोध घेण्यास अडचणी आल्या. मोबाइलमधील प्रकाशझोत सोडून पोलिसांनी तळमजल्याची पाहणी केली. तेव्हा राडारोड्याखाली पिशवी सापडली. पिशवीतील दागिने राडारोड्यात पडले होते. पोलिसांनी अंधारात दागिने शोधले. महिलेच्या पिशवीत साडेसात लाख रुपयांचे १५ तोळे दागिने होते. पोलिसांनी दागिने आणि पिशवी ओमार यांना परत केले. पोलिसांनी तत्परतेने तपास करुन दागिन्यांचा शोध लावल्याने ओमार यांनी पोलिसांनी मनोमन आभार मानले.