नारायणगाव : आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथे दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्याची माहिती मंचर वन परिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी दिली. गावडेवाडी येथील पिंपळमळा आणि बैलगाडा शर्यतीच्या घाटाजवळ वन विभागाने पिंजरे लावले होते. सोमवारी रात्री आठच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला. त्यानंतर बिबट्याला पेठ अवसरी घाटात नेऊन दुसऱ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले. पुन्हा तोच पिंजरा बैलगाडा शर्यतीच्या घाटाजवळ आणून लावण्यात आला. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुसरा बिबट्या जेरबंद झाल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले.

आंबेगाव तालुक्यातील पारगावमधील चिचगाईवस्ती येथे बिबट्याचा वावर आढळून आला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यातून महिला बचावल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. खेड तालुक्यातील काळेचीवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी एक मुलगा बिबट्याचा हल्ल्यातून बचावला.

दरम्यान, आंबेगाव जुन्नर, शिरूर, खेड या चार तालुक्यांमध्ये गेल्या २० दिवसांत वन विभागाने बारा बिबट्यांना जेरबंद केले आहेत. शिरुरमधील नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून मारण्यात आले. एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. या चारही तालुक्यांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षेसाठी वन विभागाने शिरूर, खेड, आंबेगाव परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी ४३ हून अधिक पिंजरे लावले आहेत. बिबट्यांकडून सर्वाधिक हल्ले शिरूरमध्ये झाले आहेत. या भागात १२ ऑक्टोबरपासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बिबट्यांनी ४० हल्ले केल्याची नोंद झाली आहे.

आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यांतील बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी पुढील सहा महिन्यांत ५०० ते ७०० बिबटे गुजरात येथील वनतारा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सायरन सिस्टम बसविले जाणार आहेत. बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ केंद्रीय वनमंत्री यांना भेटणार आहे. पिंजरे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.