पुणे : ‘युद्ध ही काही रोमँटिक गोष्ट नाही; ना ती एखादी चित्रपट कथा आहे. युद्धामुळे मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचे विस्थापन असे अदृश्य, पण खोल सामाजिक नुकसान होते. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे. युद्धाचा आनंद व्यक्त करणे योग्य नाही. शांतता हाच खरा विजय आहे,’ अशी भूमिका माजी लष्करप्रमुख जनरल (नि.) मनोज नरवणे यांनी मांडली. तसेच, कोणत्याही समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असून, युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
‘द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएमए) पुणे विभागाच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात नरवणे बोलत होते. शकुंतला शेट्टी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उद्योजक किशोर देसाई, माजी अध्यक्ष डॉ. धनंजय जोशी, ‘आयसीएमए’चे माजी अध्यक्ष अमित आपटे, माजी केंद्रीय समिती सदस्य संजय भार्गवे, आयसीएमए पुणे शाखाध्यक्ष नीलेश केकाण, केंद्रीय समिती सदस्य नीरज जोशी, पश्चिम भारत प्रादेशिक परिषदेचे माजी अध्यक्ष चैतन्य मोहरीर या वेळी उपस्थित होते.
अविवेकी लोकांनी युद्ध लादल्याचे सांगून नरवणे म्हणाले, ‘संरक्षणासाठी किती खर्च करावा आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासाठी किती खर्च करावा हा वाद फार जुना आहे. संरक्षणातील खर्च ही उधळपट्टी नाही. सज्ज लष्करामुळे संघर्ष टळतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. युद्ध महागडे असते, त्याची नुकसानभरपाई खर्चिक असते. त्यामुळे लष्करावरील गुंतवणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे.
‘देशासाठी आपण काही ना काही योगदान नक्की देऊ शकतो. सैन्याइतका त्याग आपण करू शकणार नाही. मात्र, त्यांच्या समर्पणातून प्रेरणा नक्कीच घेता येऊ शकते. व्यवसायाचा प्रवास एका स्वप्नापासून सुरू होतो. सामाजिक कार्य करीत राहिले पाहिजे. केवळ ताळेबंदाचीच चिंता करता कामा नये,’ असे किशोर देसाई यांनी सांगितले.