पिंपरी  :  तळेगाव – दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणात माजी नगरसेवकाचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी पसार असून पोलीस पथके त्याच्या मागावर आहेत. त्याच्या मुलाला या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

चंद्रभान उर्फ भानू खळदे असे गुन्हा दाखल झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुख सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी याबाबत माहिती दिली. १२ मे २०२३ रोजी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांचा भरदिवसा गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गौरव चंद्रभान उर्फ भानु खळदे (वय २९, रा. तळेगाव) याच्यासह श्याम अरुण निगडकर (वय ४६), प्रवीण संभाजी धोत्रे (वय ३२), आदेश विठ्ठल धोत्रे (वय २८), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय ३२), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहुरोड) या सहा आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा >>> पुणे : दोन हजार रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरनंतरही वैध; बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची स्पष्टोक्ती

आवारे हे जनसेवा विकास समितीचे संस्थापक – अध्यक्ष होते. या समितीच्या स्थापनेत चंद्रभान खळदे यांचाही सहभाग होता.  खळदे हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत खळदे यांची पत्नी  जनसेवा विकास समितीच्या तिकीटावर निवडून आली होती. डिसेंबर महिन्यात चंद्रभान खळदे आणि किशोर आवारे यांच्यात वृक्षतोडीवरून जुन्या नगरपरिषद इमारतीच्या आवारात वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. आवारे यांनी आपल्या वडिलांच्या कानशीलात लगावल्याने अपमान झाल्याचा राग त्यांचा मुलगा गौरव खळदे याच्या मनात होता. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी गौरव खळदेने खून घडवून आणल्याचे समोर आले होते.

आवारे यांच्या खुनानंतर चंद्रभान खळदे हादेखील पसार आहे. आरोपींकडे पोलीस कोठडीत केलेल्या तपासात या गुन्ह्यात चंद्रभान खळदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  दरम्यान, सहाही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी (दि. २०) संपल्याने त्यांना वडगाव – मावळ न्यायालयात हजर केले असता सर्वांच्या पोलीस कोठडीत २५ मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.