पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे दीर्घ आजाराने सोमवारी अमेरिकेत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

पेंडसे यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पाषाण येथील शस्त्र संशोधन आणि विकास संस्था (एआरडीई) येथे कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. त्याच दरम्यान भारताचे रॉकेट मॅन, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पेंडसे यांची निवड थुंबा विषुवृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्रावर साहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून केली. तिथे त्यांना डॉ. वसंत गोवारीकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने श्रीहरिकोटा येथे उपग्रह प्रक्षेपण केंद्र उभारण्यासाठी गोवारीकर यांना पाचारण केले. त्या वेळी गोवारीकर यांनी निवड केलेल्या सहकाऱ्यांमध्ये पेंडसे यांचाही होते. त्यांच्यावर अग्निबाणासाठीच्या घन इंधनाच्या निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली. हा विभाग स्वतंत्रपणे काम करू लागल्यावर पेंडसे त्याचे प्रमुख बनले. भारताच्या एसएलव्ही ३ आणि पीएसएलव्ही प्रक्षेपणात घन इंधनाचा वापर केला गेला. १९९५ मध्ये अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते इस्रोतून बाहेर पडले. कालांतराने ते अमेरिकेतील मिशिगन येथे एका रासायनिक कंपनीत रसायन विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.