भोसरीमध्ये भावी खासदार म्हणून लागले फलक
आगामी लोकसभा निवडणूक मी लढणार आणि ती जिंकणार असा ठाम विश्वास भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघ असलेल्या भोसरीमध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा भावी खासदार उल्लेख असलेले फलक लावण्यात आले आहेत. यावर आता विलास लांडे यांनी प्रतिक्रिया दिली असून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचे तोंड भरून कौतुक करत त्यांना टोला देखील लगावला आहे.
“सर्वसामान्य कार्यकर्त्याचीच मी शिरूर लोकसभा निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवेल कोणाला उमेदवारी द्यायची. जो कोणी उमेदवार असेल त्याचं मी काम करेल. २०१९ पासूनच मी आगामी लोकसभेची तयारी करत होतो. आगामी लोकसभा निवडणुकीला अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील तर त्यांना माझा विरोध नाही. खासदार म्हणून त्यांनी अनेक चांगली काम केलेले आहेत. ते चांगले कार्यकर्ते आहेत. विरोधाला विरोध करण्यापेक्षा चर्चा करावी. ते उभे राहत असतील तर माझा त्यांना विरोध नाही” असं विलास लांडे म्हणाले. पण यानंतर लांडे म्हणाले की मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून शंभर टक्के निवडून येईल असं सांगत जिंकण्याचा आत्मविश्वासही व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदारसंघात कोल्हे आणि लांडे असा संघर्ष दिसण्याची शक्यता आहे.



