पुणे :‘टेकड्या ही पुण्याची ओळख आहे. ती शहराची फुफ्फुसे आहेत. शहर जिवंत राहावे म्हणून टेकड्या जिवंत राहायला हव्यात. टेकड्यांचे संवर्धन गरजेचे आहे. तिथे अनधिकृत बांधकामे नकोत,’ असे मत माजी खासदार वंदना चव्हाण यांनी रविवारी व्यक्त केले. ‘टेकड्यांच्या संवर्धनासाठी बायोडायव्हर्सिटी पार्क (बीडीपी) करताना मूळ जागामालकांना योग्य मोबदला मिळायला हवा,’ असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
‘सजग नागरिक मंच’तर्फे आयोजित मासिक चर्चासत्रात ‘पुण्यातील टेकड्यांचे भवितव्य’ या विषयावर चव्हाण बोलत होत्या. ज्येष्ठ नगररचनाकार अनिता बेनिंजर, ‘भाजप’चे ज्येष्ठ नेते उज्ज्वल केसकर, ‘शिवसेने’चे (उद्धव ठाकरे) प्रशांत बधे यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला होता. ‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर आणि जुगल राठी या वेळी उपस्थित होते. ‘आयएमडीआर’च्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
चव्हाण म्हणाल्या, ‘टेकड्या सपाट करून टाकण्याचा डाव पूर्वीही आखण्यात आला होता. मात्र, पुणेकरांनी वेळीच आवाज उठवला. टेकड्यांवर अनधिकृत बांधकामे नकोत म्हणून स्पष्ट जनमत दिले. पुणेकरांना हिरव्या टेकड्याच हव्या आहेत. टेकड्यांना उद्ध्वस्त करणारी बांधकामे नकोत.’ ‘विकास प्रकल्पांच्या नावाखाली शहरातल्या टेकड्या, नद्या नष्ट करण्याचा डाव आखला जातो आहे. भूजल पातळी खालावते आहे. पिण्याच्या पाण्यासह अशुद्ध हवेच्या गंभीर समस्येने शहर ग्रासते आहे. अशा वेळी शहराचे आरोग्य निरोगी ठेवणाऱ्या टेकड्या, नद्या वाचवायला हव्यात. त्यासाठी प्रत्येक पुणेकराला सजग नागरिक व्हावे लागेल,’ असेही चव्हाण यांनी सांगितले.
बधे म्हणाले, ‘टेकड्या शहराचा नैसर्गिक वारसा आहेत. त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ती थांबवायला हवी. शहर बकाल करण्याचे प्रयत्न हाणून पाडायला हवेत.’ ‘टेकड्यांच्या संवर्धनाचा निर्णय पुणेकरांनी पूर्वीच घेतला आहे. त्यासाठी कायदाही करण्यात आला. आता मूळ जागा मालकांना किती आणि कसा मोबदला द्यायचा, हे ठरवायला हवे. शेवटी टेकड्यांचे संवर्धन गरजेचे आहे,’ असे बेनिंजर यांनी सांगितले.वेलणकर यांनी आभार मानले. स्वप्नील ठाकूर यांनी नदी वाचवण्यासाठी गाण्यातून संदेश दिला.
टेकड्या टिकायलाच हव्यात. टेकड्यांच्या संवर्धनासाठी जागामालकांची शंभर टक्के जमीन घेतली जाते. त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. पर्यावरणप्रेमींसाठी शासनाने म्हणणे मांडायची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता विरोधासाठी विरोध नको. प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शहरावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन म्हणने मांडायला हवे. त्यासाठी सजग नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा.-उज्ज्वल केसकर, भाजप