श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आणि श्री क्षेत्र देहू पंढरपूर या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता वेगाने करण्यात येईल आणि येत्या २ वर्षांत हा पालखी मार्ग पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आणि श्री क्षेत्र देहू पंढरपूर या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला मंजुरी दिल्याबद्दल नितीन गडकरी आणि या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांचा आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
आपण कधीही सत्कार स्वीकारत नाही. पण या कार्यक्रमाला मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला पालखी मार्ग पूर्ण करण्यासाठी विनोद तावडे यांनी आपल्याकडे आग्रह धरला. वारकरी संप्रदायाच्या भावनांचा विचार करुन आपण तातडीने या विषयी आपल्या खात्याच्या सचिवांकडून माहिती मागविली आणि सोलापूरमध्ये याबाबत घोषणा केल्याचे गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पालखी मार्गाला सुमारे ४५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, पालखी मार्ग सुमारे सव्वाचारशे किलोमीटरचा असून हा मार्ग पूर्णपणे कॉंक्रिटचा करण्यात येईल. परंतु त्यामुळे या मार्गावरून मार्गस्थ होणा-या वारकर-यांच्या पायाला सिमेंटच्या रस्त्याचे चटके बसू शकतात, त्यामुळे या रस्त्यावर खास बीटो मिन्स तंत्रज्ञान वापरण्यात येईल, असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला शौचालये, निवासाची व्यवस्था, रेस्तरॉं आदी सोयीसुविधा निर्माण करण्यात येतील, असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.