पिंपरी :  क्रेडीट कार्डवर गुन्हेगारांच्या टोळीने कर्ज काढल्याचे सांगून डिजिटल अटकेची भीती घालत वृद्ध महिलेला पैसे भरण्यास सांगितले. घाबरलेली महिला बँकेत गेली असता बँक अधिकारी – कर्मचार्‍यांनी विचारपूस केल्यानंतर हा फसवणुकीच्या प्रयत्नाचा प्रकार समोर आला. सांगवी येथे २८ आणि २९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ही घटना घडली.

याप्रकरणी ७१ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय पाटील, संदीप राव, दीपारनीता मुन्शीकर आणि एक अज्ञात महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृद्ध महिलेचा मुलगा विदेशात वास्तव्यास असून महिला सांगवी येथे एकटीच राहते. आरोपी महिलेने फिर्यादी वृद्ध महिलेला फोन केला.

तुमच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून साडेतीन लाखांचे कर्ज काढले आहे. कर्ज थकल्याने न्यायालयात खटला दाखल केला आहे, असे वृद्धेला सांगितले. त्यानंतर इतर आरोपींनीही वृद्ध महिलेशी फोनवरून संपर्क साधला. तुमच्या कर्ज प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीबीआयकडे प्रकरण वर्ग केले आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करावी लागेल, असे सांगत आरोपींनी वृद्धेला भीती दाखवली. गुन्हा बंद करण्यासाठी बँकेत पैसे भरा, असे सांगितले. त्यामुळे वृद्धा घाबरली होती.

आरोपींनी सातत्याने फोन करून पैसे भरण्यास सांगितल्याने वृद्धा बँकेतील ठेवीची रक्कम (एफडी) काढण्यासाठी गेली. पहिल्या दिवशी ठेवीची काही रक्कम घेतली. त्यानंतर पुन्हा रक्कम काढण्यासाठी वृद्धा बँकेत गेली. तिला खूप घाबरलेल्या अवस्थेत पाहून तसेच, अचानक ठेवीची रक्कम काढण्याची काय आवश्यकता आहे, असे म्हणत बँक कर्मचारी व अधिकार्‍यांनी विचारपूस केली.

आरोपींनी पैशांची मागणी केल्याचे वृद्धेने सांगितले. बँक अधिकार्‍यांनी वृद्धेला धीर देत हा डिजिटल अटकेचा प्रकार असल्याचे सांगितले. तसेच, तिला पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. सायबर पोलिसांनी याबाबत माहिती घेतली. त्यानंतर याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँक कर्मचारी, अधिकार्‍यांचे कौतुक डिजिटल अटकेच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून जनजागृती केली जात आहे. या प्रकरणात वृद्ध महिलेला धीर देत तिला पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी बँक कर्मचारी व अधिकार्‍यांनी मदत केली. त्यांच्या सतर्कतेमुळे फसवणुकीचा प्रकार टळला. तसेच, वृद्धा तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे आली. त्यामुळे पोलिसांनी बँक कर्मचारी व अधिकार्‍यांचा सन्मान करत कौतुक केले.