पिंपरी : पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून आणि मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांची दोन कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्यातील आंतरराज्यीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सात आरोपींना कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि मुंबई अशा चार राज्यांतून पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून अटक करण्यात आली.
मोहम्मद आमेर अखिल मोहम्मद आरीफ (३५, हैदराबाद), जिगर जितेश पटेल (२३, मुंबई), अजिथ विजयन (३६, केरळ), सचिन पी. प्रकाश (२६, कर्नाटक), मोहम्मद रिहान मोहम्मद तजमुल (१८, म्हैसूर), सय्यद ओवेझ आफनान सय्यद शौकत (२०, म्हैसूर) आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी ज्येष्ठ नागरिकांना आरोपींनी समाजमाध्यमावर व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. ‘कुरिअर कंपनीचा अधिकारी’ आणि ‘मुंबई पोलीस अधिकारी’ असल्याचे भासवले. तुमच्या नावाचे पार्सलमध्ये अमली पदार्थ, लॅपटॉप आणि कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादींना विविध खात्यांवर मोठ्या रकमा जमा करण्यास भाग पाडले. प्राथमिक तपासात आरोपींच्या बँक खात्यांमधून सात कोटी ८६ लाखांहून अधिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
मुख्य आरोपी मोहम्मद आमेर हा महाराष्ट्र सायबरकडील ५८ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचे ठिकाण शोधून काढले. त्यानंतर विविध राज्यांत सलग कारवाई करत सर्व आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या खात्यांवर देशभरातील ३१ तक्रारी नोंद झाल्याचेही समोर आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस यांच्या पथकाने केली.
