पुणे : मोफत साडी देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेकडील ३२ हजारांची रोकड, दागिने, मोबाइल संच असा ८५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी भागात घडली.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकी भागात राहायला आहेत. त्या शुक्रवारी (२० जून) बोपोडी चौकातून खडकीकडे दुपारी दीडच्या सुमारास निघाल्या होत्या. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले.

‘पालखी आगमनानिमित्त एका मंडळाकडून महिलांना मोफत साडी वाटण्यात येत आहे. तुम्ही श्रीमंत दिसतात. साडी हवी असल्यास दागिने, रोकड, मोबाइल संच पिशवीत ठेवा’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांना केली. चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवीतून ३२ हजारांची रोकड, दागिने, मोबाइल संच असा मुद्देमाल लांबविला. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर परिसरात मोफत साडी, धान्य वाटप, तसेच पोलीस असल्याच्या बातवणीने ज्येष्ठ महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांच्या बतावणीकडे काणाडोळा करावा,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.