पुणे : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दर महिन्याच्या आठ तारखेला महिलांना पीएमपीचा विनामूल्य प्रवास या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. या योजनेची सुरुवात शुक्रवार पासून होणार असून त्यासाठी १४ मार्गावर १९ गाडय़ांचे नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जागतिक महिलादिना निमित्त पीएमपीच्या वतीने महिलांसाठी तेजस्विनी ही बससेवा सन २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. महिलांसाठी विशेष गाडय़ा असल्याने त्याला महिला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. तेजस्विनी सेवा सुरू केल्यानंतर दहा मार्गावर ३० गाडय़ांद्वारे सेवा देण्यास सुरुवात झाली. या मार्गावर त्यानुसार प्रतिदिन २०० पेक्षा जास्त फेऱ्या होत होत्या.

दोन वर्षांपूर्वी करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे तेजस्विनी सेवाही बंद झाली. करोना संसर्गासंदर्भातील र्निबंध टप्प्याटप्प्याने हटविण्यास सुरुवात केल्यानंतर पीएमपीची सेवाही काही मार्गावर सुरू झाली. सध्या पीएमपीचे संचलन पूर्ण क्षमतेने सुरू आहे. तेजस्विनी बरोबच पुणे दर्शन आणि रातराणी सेवाही सुरू करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यातील जागतिक महिला दिनादिवशी महिला प्रवाशांना तेजस्विनीमधून प्रवास करता येऊ शकला नव्हता. त्यामुळे महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. प्रवासी संघटनांनीही त्याबाबत प्रशासनाकडे तक्रार नोंदविली होती. त्यामुळे आता या जुन्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा मृणालिनी वाणी यांनीही काही दिवसांपूर्वी ही सेवा सुरू करण्याबाबतचे निवेदन पीएमपी प्रशासनाला दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर महिन्याच्या आठ तारखेला तेजस्विनी बसमधून विनामूल्य सेवा असा ठराव पीएमपी प्रशासनानेच केला होता. तर महापालिकेने जागतिक महिला दिनादिवशी महिलांना पीएमपीमधून विनामूल्य प्रवासाचा ठराव केला होता. त्यापोटी महापालिकेकडून पीएमपीला काही निधीही देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र या दोन्ही ठरावांचा पीएमपीला विसर पडला होता.