नागरी सुविधा ‘ऑनलाईन’ करण्याची नवे आयुक्त दिनेश वाघमारे यांची ग्वाही
नागरिकांना आपल्या कामासाठी महापालिकेचे हेलपाटे पडू नयेत, यासाठी सर्वच नागरी सुविधा ‘ऑनलाईन’ करण्याचा तसेच शहर ‘वाय-फाय’ करण्यावर भर राहील, अशी ग्वाही िपपरी पालिकेचे नवे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. स्वच्छ, लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देतानाच यापुढे शहरात नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, याची खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाल्यानंतर नव्या मुंबईचे आयुक्त वाघमारे यांनी िपपरी पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे घेतली. राजीव जाधव मुंबईला गेले होते. तर, महापौर शकुंतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम यावेळी उपस्थित नव्हत्या. शहर अभियंता महावीर कांबळे, सहआयुक्त दिलीप गावडे व स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी यांनी स्वागत केल्यानंतर वाघमारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नवी मुंबई व िपपरी-चिंचवड ही बहुभाषिक व सुनियोजित शहरे आहेत. महापालिकेबरोबरच एमआयडीसी, प्राधिकरण या संस्थांच्या माध्यमातून िपपरीचा विकास झाला आहे. ग्रामपंचायत ते महापालिका असा प्रवास करणारे हे शहर राज्यातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद असला पाहिजे, तो राखण्यासाठी प्रयत्न राहील. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा, हरित शहर व्हावे, यासाठी प्रयत्न करू. घनकचरा व्यवस्थापनावर भर देऊ, झोपडपट्टय़ांमध्ये वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून देऊ. शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

रत्नागिरी ते पिंपरी व्हाया नवी मुंबई</strong>
भारतीय प्रशासकीय सेवेत १९९४ मध्ये दाखल झालेले दिनेश वाघमारे यांनी यापूर्वी रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी, वाशिम व यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अतिरिक्त आदिवासी आयुक्त, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव, अमरावतीचे विभागीय आयुक्त, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आदी पदांवर काम केले आहे.