विमानतळाच्या आवारात बेकायदा प्रवेश; महाविद्यालयीन तरुण अटकेत
पुणे : दिल्लीला जाणाऱ्या मैत्रिणीला निरोप देणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले. मैत्रिणीला निरोप देण्यासाठी या तरुणांनी थेट विमानतळाच्या आवारात बेकायदा प्रवेश केला. त्यामुळे केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा रक्षक दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्याने दोघांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी मोबाइलवर विमान प्रवासाचे तिकिट दाखविले. चौकशीत तिकिट बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
गौतम अरविंद शिंदे (वय २१) आणि महंमद अमान देसाई (वय २१) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील उपनिरीक्षक गुलझारी मीना (वय ३२) यांनी याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे आणि देसाई महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यांची मैत्रीण दुपारी विमानाने दिल्लीला जाणार होती. तिला निरोप देण्यासाठी शिंदे आणि देसाई विमानतळाच्या आवारात गेले.
विमानतळावरील प्रवेशद्वारातून दोघे जण जात होते. त्या वेळी सीआरपीएफचे उपनिरीक्षक मीना यांनी दोघांना तिकिट दाखविण्यास सांगितले. दोघांनी मोबाइलमध्ये तिकिट असल्याचे सांगितले. त्यांनी माेबाइलमध्ये दाखविलेल्या पुणे ते जयपूर प्रवासाच्या तिकिटाची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिकिट बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
शिंदे आणि देसाई मैत्रिणीला सोडण्यासाठी विमानतळावर गेले होते. तिला निरोप देण्यासाठी दोघांनी बनावट तिकिट बाळगून विमानतळाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सीआरपीएफच्या तपासणीत त्यांच्याकडे असलेले तिकिट बनावट असल्याचे आढळून आल्याचे विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले.