|| प्राची आमले

समाजमाध्यमांचा वापर करून सुरू झालेल्या मैत्रिणी कट्टय़ाचा सुरुवातीला फक्त दर महिन्याला एक उपक्रम व्हायचा. मात्र आता हा कट्टा चांगलाच फुलला आहे. मैत्रिणींना बळ देणाऱ्या या कट्टय़ाविषयी..

समाजमाध्यमांमुळे कुटुंबातील सदस्य एकमेकांशी बोलत नाही, नात्यांमध्ये दुरावा आला आहे, अशी ओरड आपण सर्रास ऐकत असतो. परंतु याच समाजमाध्यमाचा वापर करून समाजातील महिलांना एकत्र आणत त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचेही काम सुरू आहे. समाजमाध्यमाच्या वापरातून कलागुणांना व्यासपीठ देणारा उपक्रम राबवून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना एकत्र आणण्याचे हे काम ‘मैत्रिणी कट्टा’ या गटाने केले आहे.

लग्नानंतर संसार, नोकरी, करीअर अशी तारेवरची कसरत करत असताना अनेक वेळा महिला स्वत:साठी जगणे विसरून जातात. आपल्या अडीअडचणींचा सामना त्या एकटय़ा करत असतात. मन मोकळे करण्यासाठी त्यांना गरज असते ती एका ‘मैत्रिणीची.’ जिच्या जवळ आपल्या मनातील लहान-मोठी गोष्ट विनासंकोच सांगता येते, अशी मैत्रीण महिलांना हवी असते. ही भावना लक्षात घेत ‘मैत्रिणी कट्टा’ या गटाची स्थापना करण्यात आली. कट्टय़ाची सुरुवात होण्याअगोदर सर्व मैत्रिणी फक्त सहलीच्या निमित्ताने भेटत असत. सहलीनंतर कामाच्या व्यापामुळे कोणाचा कोणाशी काही संपर्क होत नसे. ही अडचण लक्षात घेऊन महिलांचा एक कट्टा असावा या विचाराने आशा पोलकडे, प्रतीक्षा मिरज, स्वाती काळभोर, श्रीदेवी नरुणी या चार मैत्रिणींनी एकत्र येऊन व्हॉट्सअ‍ॅपवर ‘मैत्रिणी कट्टा’ हा ग्रुप सुरू केला.

कट्टय़ाच्या संस्थापक आशा पोलकडे म्हणाल्या, सुरुवातीला आमच्या गटाची सदस्य संख्या कमी होती. त्यामुळे फक्त महिन्याला एक शिबिर आयोजित केले जात असे. हळूहळू महिलांची ओळख वाढली आणि समाजमाध्यमामुळे कट्टय़ाची माहिती अनेक महिलांपर्यंत गेली. मग हा कट्टा मैत्रिणींनी फुलू लागला. वर्षभरातच गटाला पाचशे महिला जोडल्या गेल्या. महिलांची संख्या वाढल्याने ‘मैत्रिणी कट्टा’ आणि ‘बिझनेस कट्टा’ असे दोन गट  व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू करण्यात आले आहेत.

‘मैत्रिणी कट्टा’वर शहरात भरणारे प्रदर्शन, व्याख्यान, गटाद्वारे घेण्यात येणारे कार्यक्रम यांची माहिती दिली जाते. व्याख्यानांचे विषय, स्पर्धा, आरोग्यविषयक, आहाराविषयक सूचना या विषयी माहिती महिलांना दिली जाते. तर ‘बिझनेस कट्टा’वर महिलांनी केलेल्या वस्तूंची जाहिरात केली जाते. लोणची, पापड, केक यांची ऑर्डर घेतली जाते. केटरिंग, जेवणाच्या डब्यांची ऑर्डर घेतली जाते. फक्त खाद्यपदार्थच नव्हे तर आयुर्वेदिक तेल, मोत्याचे दागिने, कपडे, सौंदर्यप्रसाधने अशा अनेक गोष्टींची विक्री गटातील महिला करतात. यामुळे अनेक महिलांना घरबसल्या रोजगार सुरू झाला आहे.

दर आठवडय़ाला बुधवारी सायं. ५.३० ते ७.३० या वेळेत सर्व सदस्य महिला भेटतात. आठवडय़ाला एक विषय गट चर्चेसाठी ठरवला जातो. त्या विषयावर सर्वजणी बोलतात. त्यातून नवीन माहितीची देवाण-घेवाण केली जाते. एवढेच नव्हे तर वृद्धाश्रमाला भेट देणे, महिलांसाठी प्रदर्शन भरविणे, वनभोजन असे उपक्रम देखील राबविण्यात येतात असे पोलकडे यांनी सांगितले. गटात ३२ ते ७२ वर्षांपर्यंतच्या महिला असून गटातील काही महिला या नोकरी करणाऱ्या आहेत, परंतु त्यादेखील काही वेळ या गटासाठी काढतात.

महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून पिंपरी-चिंचवडमधील खान्देश मराठा मंडळामध्ये महिलांनी बनवलेल्या खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्याचा उपक्रम करण्यात आला. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हे सांगताना पोलकडे म्हणाल्या, जाहिरात न करता फक्त समाजमाध्यमांमुळे खाद्यपदार्थाच्या स्टॉलविषयी अनेकांना माहिती मिळाली आणि लोक मोठय़ा संख्येने सहभागी झाले. महिलांना एकत्र आणत त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी समाजमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गटातील पुढील उपक्रमांविषयी त्या म्हणाल्या, गटातील महिलांची संख्या वाढत असून  महिलांचे स्वतंत्र ढोल-ताशा पथक, नवरात्रीसाठी गरबा पथक, नाटय़ स्पर्धा, नृत्य प्रशिक्षण, समुपदेशनाचे वर्ग असेही उपक्रम आयोजिण्यात येणार आहेत. उपक्रमांमधील सहभागासाठी शुल्क आकारले जात नाही. गटाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे हा यामागील उद्देश आहे. गटामध्ये सहभागी होण्यासाठी ९५५२३१३६३१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.