परराष्ट्र व्यवहारामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो तसा कायमचा शत्रूही नसतो. कायमस्वरूपी हितसंबंधांना महत्त्व यालाच प्राधान्यक्रम असतो. भारतामध्ये अशांतता रहावी यासाठी पाकिस्तान तर, आशियामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. या पाश्र्वभूमीवर देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड न करता या दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण सहकार्याचे धोरण हेच भारताच्या हिताचे आहे, असे मत पाकिस्तानमधील माजी उच्चायुक्त आणि राजदूत जी. पार्थसारथी यांनी शनिवारी व्यक्त केले.
ज्ञानेश्वर मुळे एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘पाकिस्तान आणि चीन कधी आपले मित्र होतील का’ या विषयावर जी. पार्थसारथी यांचे व्याख्यान झाले. ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर याप्रसंगी उपस्थित होते.
जी. पार्थसारथी म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या चार दशकांमध्ये भारताने व्यापारावर लक्ष केंद्रित केले नाही. त्यामुळे आशियाई राष्ट्रांमध्ये भारत पिछाडीवर राहिला. पाकिस्तानबरोबरच्या संबंधांमध्ये केवळ काश्मीरचा मुद्दा हाच महत्त्वाचा नाही. काश्मीर पाकिस्तानला दिल्यानंतर आपले संबंध सुरळीत होतील असे ज्यांचे मत असेल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे. धर्मरिपेक्षतेच्या तत्त्वावर भारताची निर्मिती झाली आहे. ज्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली ते बॅ. जीना आणि लियाकत अली खान हे नेते मूळचे भारतातील होते. त्यामुळे पाकिस्तानची ओळख काय हा प्रश्न उपस्थित होतो. इस्लामिक आहे असे म्हणावे तर, बांगला देशाची निर्मिती हीदेखील धर्माच्या तत्त्वावरच झाली आहे.
गेल्या पाच वर्षांत चीन आणि तालिबान नेतृत्व यांच्यामधील संबंध इतके गडद असूनही केंद्र सरकार त्याविषयी भाष्य करीत नाही. तालिबान हे ‘आयएसआय’चे हस्तक आहे. तालिबानला अफगाणिस्तानध्ये त्यांच्या दृष्टीने अनुकूल सरकार हवे आहे. त्यामुळे ते पाकिस्तानवर दबाव टाकत आहे. तर, दुसरीकडे चीन तालिबानी आणि पाकिस्तानी नेतृत्वाशी संबंध ठेवण्याची दुटप्पी भूमिका घेत आहे. पाकिस्तानचे अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र चीनी बनावटीची असून या दोन्ही देशांमधील संबंधांविषयी भारत सरकार उघडपणे भूमिका घेत नाही. भविष्यामध्ये पाकिस्तानमध्ये कमकुमवत आघाडी सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे, याकडे पार्थसारथी यांनी लक्ष वेधले.