माहिती व प्रसारण मंत्रालयाबरोबर एकामागोमाग एक अशा तब्बल पाच बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे अखेर ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी संपाच्या १३९ व्या दिवशी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्र्यांनीही निर्णय घेणे आपल्या अधिकारात येत नसल्याचेच उत्तर दिले. मग निर्णय घेण्याचा अधिकार नक्की आहे तरी कुणाला?, देश कोण चालवत आहे?,’ असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले असून ‘संप मागे; पण असहकार सुरू,’ अशी भूमिकाही विद्यार्थी संघटनेने मांडली आहे.
विद्यार्थी संस्थेच्या शैक्षणिक बाबींमध्ये बुधवारपासूनच सहभागी होत असल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत दिली. संघटनेचे अध्यक्ष हरिशंकर नाचिमुथ्थू, विकास अर्स, राकेश शुक्ला आणि यशस्वी हे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. अर्स म्हणाले,‘आम्ही अभ्यास वर्गात परत जात असलो तरी या १३९ दिवसांत आम्हाला आलेले अनुभव आम्ही बनवू त्या चित्रपटांमधून समोर येतील. आम्ही निषेध नोंदवणे बंद करणार नाही. देशातील चित्रपटकर्मी आणि कलाकारांनीही आमचा लढा पुढे नेण्यास हातभार लावावा अशी अपेक्षा आहे. एफटीआयआय सोसायटीवर झालेल्या वादग्रस्त नियुक्तयांचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही मंत्रालयाला इतर कोणत्याही बाबतीत सहकार्य करणार नाही.’
एफटीआयआय सोसायटीच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाल्याच्या निषेधार्थ १२ जून रोजी सुरू झालेला हा संप देशातील सर्वात लांबलेल्या संपांपैकी एक ठरला. चौहान यांच्यासह सोसायटीच्या सदस्यपदी निवडल्या गेलेल्या अनघा घैसास, नरेंद्र पाठक, राहुल सोलापूरकर व शैलेश गुप्ता यांनाही विद्यार्थ्यांचा विरोध आहे. या पाचही सदस्यांना हटवून एफटीआयआय सोसायटीची पुनर्रचना केली जावी ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती, प्रत्यक्षात यातील एकाही व्यक्तीस आपले पद सोडावे न लागताच संप मागे घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उपोषणसत्रानंतर मंत्रालयाबरोबर झालेल्या बैठकांमध्येही संपाचा मूळ मुद्दा सोडून संस्थेतील पायाभूत सुविधांविषयीचे दुसरेच विषय चर्चेत राहिले.
तीन माजी विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय पुरस्कार परत
संस्थेचे माजी विद्यार्थी विक्रांत पवार, प्रतीक वत्स आणि राकेश शुक्ला यांनी त्यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार निषेधार्थ परत करत असल्याची घोषणा केली. संस्थेच्या २००६ बॅचचे विद्यार्थी पवार यांच्या ‘कातळ’ (२०१२) या लघुचित्रपटास दिग्दर्शनासाठीच्या पारितोषिकासह ‘बेस्ट शॉर्ट फिक्शन’ प्रकारात राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. याच बॅचचे प्रतीक वत्स यांच्या ‘कल, १५ ऑगस्ट, दुकान बंद रहेगी’ (२०१२) या लघुचित्रपटास राष्ट्रपतींचे रौप्यपदक मिळाले होते, तर शुक्ला यांच्या ‘द डाँकी फेअर’ या लघुचित्रपटास गतवर्षी ‘नॅशनल स्टुडंटस् फिल्म अॅवॉर्डस्’मध्ये विशेष उल्लेखनीय लघुचित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते.
शैक्षणिक वर्गाना सुरुवात करण्याबाबत शिक्षकांशी चर्चा झाली असून पुढच्या सोमवारपासून दूरचित्रवाणी विभागाचे, तर पुढच्या बुधवारपासून चित्रपट विभागाचे वर्ग सुरू केले जातील.
– प्रशांत पाठराबे, संचालक, एफटीआयआय
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2015 रोजी प्रकाशित
‘एफटीआयआय’चा संप तोडग्याविनाच मागे!
तब्बल पाच बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे अखेर ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
Written by दया ठोंबरे

First published on: 29-10-2015 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ftii strike called off