पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या चार विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शैक्षणिक वर्षांचे व प्रवेश परीक्षा शुल्कात सातत्याने होत असलेल्या वाढीविरोधात हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

उपोषणास बसलेल्या ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे म्हणने आहे की, २०१३ च्या तुकडीनंतर शैक्षणिक शुल्कात दहा टक्के वाढ झालेली आहे. २०१३ मध्ये ५५ हजार ३८० रुपये वार्षिक शुल्क होते, जे आता आगामी २०२० च्या तुकडीसाठी तब्बल १ लाख १८ हजार ३२३ रुपये झाले आहे.

याचबरोबर विद्यार्थ्यांनी हे देखील म्हटले आहे की, ‘एफटीआयआय’ व सत्यजीत रे फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ‘एसआरएफटीआय’ मधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परिक्षेच्या शुल्कात देखील मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. २०१५ मध्ये प्रवेश शुल्क केवळ १ हजार ५०० रुपये होते, जे जेईटीने वाढवून २०२० पर्यंत १० हजार रुपयांपर्यंत नेले आहे. यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश घेणे कठीण होणार आहे.

दहा टक्के शुल्क वाढ रद्द करावी आणि शुल्क कमी करावे व जो पर्यंत प्रवेश परीक्षा शुल्क कमी केले जात नाही, तोपर्यंत जेईटी-२०२० प्रवेश परीक्षेस तात्काळ स्थगिती आणावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तसेच, मागील तीन वर्षांपासून सातत्याने या शुल्क वाढीविरोधात आवाज उठला जात होता, मात्र याकडे दुर्लक्ष केल्यागेल्याने आम्हाला बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागला असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे.