भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेमध्ये चालवण्यात येणाऱ्या बहुतेक पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया या वर्षी पुढे ढकलण्याचा निर्णय संस्थेच्या नियामक मंडळाने घेतला आहे. संस्थेच्या बहुतेक अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्याचे काम सध्या सुरू असून एक वर्षांचे बहुतेक अभ्यासक्रम दोन वर्षांचे करण्याचेही संस्थेच्या विचाराधीन आहे.
भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेमध्ये दिग्दर्शन, ध्वनिसंयोजन, चलचित्रण, अभिनय असे विविध अकरा अभ्यासक्रम चालतात. या अभ्यासक्रमांसाठी १३२ प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी साधारण ३ ते ४ हजार विद्यार्थी दरवर्षी अर्ज करतात. मात्र, या वर्षी या संस्थेमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येणार आहे. या वर्षी दोन आणि तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश न करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. दिग्दर्शन, ध्वनिसंयोजन, चलचित्रण, अभिनय, निर्मिती, कला दिग्दर्शन या काही विषयांची प्रवेश प्रक्रिया या वर्षी होणार नाही. मात्र, एक वर्ष कालावधीचे दूरचित्रवाणीसाठी असलेले आणि चित्रपट पटकथा लेखनाचे अभ्यासक्रम या वर्षी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत. संस्थेच्या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक हे देशातील इतर संस्थांच्या अभ्यासक्रमांशी मिळते जुळते असावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत संस्थेच्या नियामक मंडळामध्ये निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेच्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात येत असून एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम दोन वर्षांचे करण्यात येणार आहेत. दोन वर्षांचे अभ्यासक्रम तीन वर्षांचे करण्याचे विचाराधीन आहे. नव्या अभ्यासक्रमांसाठी येत्या महिनाभरामध्ये मंजुरी येणे अपेक्षित आहे. त्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षांपासून नवे अभ्यासक्रम अमलात येणार आहेत.
‘इतर विद्यापीठांच्या किंवा संस्थांच्या बरोबरीने वेळापत्रक असावे, या उद्देशाने प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. पुढील वर्षांपासून हे वेळापत्रक अमलात येईल. त्यामुळे दोन आणि तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाची या वर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. एक वर्षांच्या अभ्यासक्रमांचेही वेळापत्रक बदलण्यात येणार असून हे अभ्यासक्रम आता दोन वर्षांचे होणार आहे. विशेषत: दूरचित्रवाणीसंबंधीच्या अभ्यासक्रमांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. जेणेकरून हे अभ्यासक्रम अधिक अद्ययावत आणि चांगले व्हावेत.’’
डॉ. डी. जी. नारायण, संचालक, भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था