पुणे : राज्यातील अकरावी प्रवेशाच्या अखेरच्या फेरीची निवडयादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यात प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शनिवारी (३० ऑगस्ट) संधी मिळणार आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून यंदा पहिल्यांदाच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे.

राज्यातील ९ हजार ५३५ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेशासाठीच्या १८ लाख १५ हजार १६५, कोटा प्रवेशासाठीच्या ३ लाख ३३ हजार ६७ जागा अशा एकूण २१ लाख ५९ हजार २३२ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी १४ लाख ७९ हजार ६५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ११ लाख ३२ हजार ३६९ विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे, तर १ललाख ६६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी कोट्यातील जागांवर प्रवेश घेतला.

आता प्रवेशासाठी अद्यापही कोटा आणि केंद्रीभूत प्रवेश मिळून ८ लाख ६० हजार ७५८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी अकरावी प्रवेशाची ही अखेरची फेरी असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या फेरीत प्रवेश पूर्ण न झाल्यास प्रवेशांसाठी मुदतवाढ मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.