संभाव्य उमेदवारांचा मात्र हात आखडता

एकीकडे राजकीय वर्तुळात लोकसभा-विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच, दोन दिवसांनी गणेशोत्सव सुरू होत आहे.  निवडणुकांच्या आखाडय़ात उतरण्यासाठी आतुर असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून रग्गड वर्गणी मिळेल, अशी मंडळांना आशा असली, तरी अजून कशात काही नसल्याचे सांगत उमेदवारांनी आखडता हात ठेवल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होणार की वेगवेगळ्या, याचे आडाखे राजकीय वर्तुळात मांडले जात आहेत. राजकीय नेत्यांकडून किती वर्गणी मिळेल, याचेच गणित मंडळांकडून मांडले जात आहे. लोकसभा आणि विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असणारे आर्थिकदृष्टय़ा भरभक्कम असल्याने त्यांच्या संपन्नतेचा मंडळाला कसा फायदा होईल, याचा विचार प्राधान्याने केला जात आहे. त्यामुळे रोख वर्गणी, मंडळासाठी उपयुक्त साहित्य तथा इतर मार्गाने या राजकारण्यांची ‘कृपादृष्टी’ व्हावी, यासाठी मंडळांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. तथापि, उमेदवारांनी ‘वाटपाची’ सुरुवात आताच न करण्याची सावध भूमिका घेतली आहे. त्यामागे इतर कारणेही आहेत. बहुतांश उमेदवार स्वंयघोषित आहेत.

तिकीट मिळण्याची त्यांना खात्री नाही. त्यामुळे मोठय़ा रकमांच्या वर्गण्या देणे उपयोगाचे नाही, असे त्यांचे धोरण आहे. निवडणुका कधी आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आताच ‘वाटप केंद्र’ उघडल्यास मोक्याच्या क्षणी दमछाक होईल, अशी धास्ती अनेकांना वाटते.

निवडणुका जवळ आल्यानंतर मंडळांचे खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस सुरू होतात. अनेक उमेदवारांच्या कार्यालयांमध्ये अधिकृतपणे वाटप केंद्र सुरू झालेले असते. बहुतांश मंडळांचा रोख रक्कम देण्याविषयी आग्रह असतो. स्पीकर साहित्य, मिरवणुकीचा खर्च, पूजेचा खर्च असे विविध पर्यायही दिले जातात. तसे वातावरण सध्या दिसू लागले आहे. मंडळांना रग्गड वर्गणीची कितीही आशा असली, तरी उमेदवारांचा हात आखडता असल्याचे दिसून येते.

लबाडाचे आवतान

पिंपरीत विधानसभेसाठी इच्छुक असणारा एक नेता आहे. गणेशोत्सवासाठी मोठय़ा आकडय़ांच्या पावत्या फाडणे आणि प्रत्यक्षात, वर्गणी न देणे, अशी त्याची ख्याती आहे. मंडळांना धनादेश देणे, हा याचा छंद आहे. मात्र, ते धनादेश वटत नाहीत, अशी मंडळांची तक्रार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नेत्याच्या अशा ‘दातृत्वाचा’ अनुभव मंडळे घेत आहेत. आता निवडणुकांसाठी पुन्हा तयारीत असलेल्या या नेत्याने प्रमुख मंडळांच्या वर्गणीसाठी मोठय़ा रकमा देण्याचे नियोजन केले आहे. मात्र, पूर्वानुभव पाहता ‘लबाडाचं आवतान’ अशीच मंडळांची धारणा झाली आहे.