scorecardresearch

पुणे : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनात गणेश देवी, डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सहभाग

महाराष्ट्रभरातून आलेले तरूण-तरुणी आठ गटात विभागून वर्तमानातील विषयावर आपले विचार मांडतील.

पुणे : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनात गणेश देवी, डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सहभाग

सध्या अनुभवत असलेल्या एकाधिकारशाहीचा महिला, दलित, अल्पसंख्य या घटकांसह शिक्षण ,रोजगारावर होणारा परिणाम या विषयांवर विचारवंत, कलाकार कार्यकर्ते यांची चर्चा, नव्या पिढीची व्यक्त होण्याच्या लघु चित्रपट, माहितीपट या माध्यमांसह भारुड, अभंग आणि नाटक याचे सादरीकरण ही यंदा पुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची वैशिष्ट्य असणार आहेत. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ.. गणेश देवी, ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखे आणि लेखिका मनस्विनी लता रवींद्र या संमेलनात सहभागी होणार आहेत.

साने गुरुजी स्मारक येथे होणाऱ्या १४ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर अध्यक्ष असून नाटकामध्ये नवीन विचारांची पायवाट रुजवू पाहणारे नाट्यकर्मी मंजूल भारद्वाज संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. विविध उपेक्षित समाज घटकांचा सहभाग, देशाच्या भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक विविधता जोपासणाऱ्या आणि एकत्वाचा संदेश देणाऱ्या वास्तवाचे प्रतीक म्हणून राबणाऱ्या बहुजन समाजाचा आधार असलेली देशाच्या बहु विविधतेत एकत्वाचा टाका घातलेली ‘गोधडी’ हे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून निवडण्यात आले आहे, अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव आणि निमंत्रक नितीन पवार यांनी मंग‌ळवारी पत्रकार परिषदेत दिली. लुप्त होत चाललेल्या वाद्यांचे फ्यूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, संत तुकोबारायांचा अभंग, म. जोतीराव फुले यांच्या अखंड गायनाने संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यापूर्वी फुले वाडा येथून संमेलन स्थळापर्यंत शिवसन्मान मिरवणूक काढण्यात येईल. महाराष्ट्रभरातून आलेले तरूण-तरुणी आठ गटात विभागून वर्तमानातील विषयावर आपले विचार मांडतील. निमंत्रितांचे कविसंमेलन, ‘गोधडी’ नाटक, लघुचित्रपट, माहितीपट, अभंग, रॅप, चळवळीतील गीते यांचे सादरीकरण होणार आहे. जागतिक पातळीवर चर्चा झालेले, पावरा या आदिवासी समाजातून आलेले  गोसा पेंटर यांची चित्रे हेही संमेलनाचे विशेष आकर्षण असेल, असे पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 19:22 IST

संबंधित बातम्या