ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. आदिशक्ती स्वरूपातील हजारो महिलांच्या मुखातून शुक्रवारी पहाटेच्या मंगलसमयी अथर्वशीर्षांचे पठण सुरू असतानाच या भक्तीला साद घालत वरुणराजा पावला. रिमझिम बरसणाऱ्या पावसाचे नंतर जोरदार सरीमध्ये रूपांतर झाले. मात्र, पावसाची तमा न बाळगता महिलांनी अथर्वशीर्ष पठण पूर्ण करीत आरती करून गणरायाचे दर्शन घेतल्यावरच मंडप सोडला.
ऋषिपंचमीचे औचित्य साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणरायासमोर नऊवारी साडी आणि नथ अशा पारंपरिक पेहरावातील हजारो महिलांनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले. पोलीस आयुक्त के. के. पाठक, शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी गिरिजा बापट, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, विश्वस्त शंकरराव सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, या उपक्रमाचे संयोजक अरुण भालेराव आणि शुभांगी भालेराव या प्रसंगी उपस्थित होत्या.
अथर्वशीर्ष पठणाची नियोजित वेळ सव्वासहा असली तरी पहाटे पाच वाजल्यापासून सुवासिनींची लगबग सुरू होती. अवघ्या अध्र्या तासामध्ये बेलबाग चौकापर्यंत महिलांनी रस्ता व्यापून टाकला होता. प्रत्यक्ष पठण सुरू होईपर्यंत महिलांची रांग दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापर्यंत पोहोचली होती. अथर्वशीर्ष पठण होण्याआधी नटलेल्या युवती आणि महिलांनी मोबाइलवर ‘सेल्फी’ काढून घेतला. पाच सुवासिनींनी केलेल्या शंखनिनादाने प्रारंभ झाला. तीन वेळा ओंकाराचा नाद झाल्यावर अनुराधा प्रभाकर पंडित यांनी सहकाऱ्यांच्या साथीने गणेशवंदना सादर केली. अथर्वशीर्ष पठण सुरू असतानाच वरुणराजाने हजेरी लावली. प्रारंभी रिमझिम बरसणाऱ्या पावसाचे जोरदार सरीमध्ये रूपांतर झाले. मात्र, अथर्वशीर्षांचे आवर्तन झाल्यानंतर महाआरती झाल्यावर महिलांनी आपली जागा सोडली. मनोभावे हात जोडून गणपतीचे दर्शन घेतल्यानंतरच पावसामध्ये भिजलेल्या सुवासिनींनी घरचा रस्ता गाठला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav atharvashirsha women
First published on: 19-09-2015 at 03:20 IST