मध्यरात्री हॉटेलमध्ये प्रवेश करण्यास मनाई करणाऱ्या कामगारावर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मुंढवा भागात घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात हॉटेल कामगार गंभीर जखमी झाला आहे. धीरेंद्र चौहान (वय २७, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या बाबत चौहान याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये चौहान कामाला आहे.
हेही वाचा >>> पुणे: पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला सिंहगड रस्त्यावर पकडले
मध्यरात्री एक टोळके हॉटेलमध्ये आले होते. हॉटेल बंद झाल्याचे चौहान याने सांगितल्याने आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास चौहान हॉटेलमधील सहकाऱ्यासोबत घरी निघाला होता. त्या वेळी ताडीगुत्ता चौकात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी चौहानला अडवले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे अधिक तपास करत आहेत.