पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढत असलेली ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) च्या रुग्णांची संख्या पाहता महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस च्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. या आजाराचे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या ‘शहरी गरीब योजने’अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची मदत देखील केली जाणार आहे.

पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, किरकिटवाडी, डीएसके विश्व यासह आजुबाजुच्या परिसरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागातील नागरिकांना ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो ते पाणी दुषित असल्याने या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांकडून केला जात आहे. या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

पुण्यातील ‘जीबीएस’च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिताचा आढावा घेतला.

शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार खर्चिक असल्याने महापालिकेने पुणेकरांना उपचारासाठी आर्थिक मदत करावी, अशी सूचना मोहोळ यांनी आयुक्तांना केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयात मोफत उपचार उपलब्ध करुन देण्यााचा निर्णय घेतला असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. तसेच या आजाराच्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी मदत केली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, शहरात ‘जीबीएस’चे रुग्ण आढळत आहेत. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. याचे उपचार महाग आहेत. त्यामुळे महापालिकेने पुणेकरांना उपचारांसाठी आर्थिक मदत करावी, अशी सूचनाही आयुक्तांना केली होती. यामुळे पुणेकरांना नक्कीच दिलासा मिळेल.