देशाचा विकास होतो आहे, अशी हाकाटी पिटली जात असली तरी तो खरा विकास नाही. सकल राष्ट्रीय उप्तन्न (जीडीपी) झालेली वाढ म्हणजे विकास हा अर्थतज्ज्ञांचा दावा फसवणूक करणारा आहे. विकास म्हणजे वैयक्तिक स्तरावर बहुतांशांचे सुधारलेले आर्थिक जीवनमान असून त्याची मोठी किंमत प्रत्येक स्तरावर मोजावी लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत निसर्ग हा आपला मित्र आहे असे समजून आपण त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत ही हानी भरून निघणार नाही, असे, मत पर्यावरणवादी लेखक दिलीप कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले.
दिलीप कुलकर्णी यांच्या ‘निसर्गायण’ या ग्रंथाच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त कुलकर्णी यांची मुलाखत वनस्पतीतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी घेतली. त्यावेळी ग्रंथामागील लेखन प्रवास कुलकर्णी यांनी उलगडताना नैसर्गिक साधनांचा होणारा अमर्याद वापर, निसर्गाकडे बघण्याच्या अलीकडच्या दृष्टिकोनावर भाष्य केले. ते म्हणाले की, टेल्कोमध्ये नोकरीस असताना यांत्रिक व्यवस्था, ऊर्जेचा वापर कसा चुकीच्या पद्धतीने होत आहे, याची जाणीव झाली. याच कालावधीत असंख्य पुस्तके वाचताना शैली घडली. अमेरिकेत असताना तेथील एका पुस्तकाने प्रेरित होऊन निसर्गाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे निश्चित केले. उत्कट विचार हेच त्यामागील प्रमुख कारण होते. पर्यावरणात तत्त्वज्ञान, राष्ट्रीय धोरण, अर्थशास्त्र, समाजशास्त्राचाही संबंध आहे. त्यात अध्यात्मही दडले आहे. अलीकडे मात्र पर्यावरण हे यांत्रिक वाटत आहे. त्यामुळे त्याची लुबाडणूक होत आहे. तंत्रज्ञान आणि ऊर्जा हेच मानवाचे प्रमुख शत्रू आहेत. तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होत आहे. पण त्यातून जैववैविध्यता संपुष्टात येत आहे. निसर्गालाही जैववैविध्यता हवी असते. त्यामुळेच आता वैचारिक बदल अपेक्षित असून निसर्गाला जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.