लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: केंद्र सरकारच्या आदेशानुसार वय वर्षे १८ पुढील नागरिकांना नव्याने आधारकार्ड ठरावीक केंद्रांवरच काढता येणार आहे. सरसकट सर्वच आधार केंद्रांवर नवे आधारकार्ड काढता येणार नाही. याबाबतचे आदेश भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील सर्व आधार केंद्र चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत एक कोटी ३२ लाख सहा हजार १०४ नागरिकांनी (९९.६ टक्के) आधारकार्ड काढली आहेत. त्यामध्ये ३० लाख नागरिकांनी दहा वर्षांपूर्वी आधार काढले आहे. त्यामुळे १८ वर्षांपुढील आधार नसलेल्या नागरिकांची संख्या अत्यल्प आहे. या पार्श्वभूमीवर यूआयडीएआयकडून हे आदेश देण्यात आले आहेत. १८ वर्षांपुढील नागरिकांना आधार काढायचे असल्यास ठरावीक आधार केंद्रांवरच आवश्यक सर्व कागदपत्रे असल्यास छाननी करून आधार काढता येणार आहे. त्याकरिता यूआयडीएआयकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात तालुका स्तरावर प्रत्येकी एक आधार केंद्र नव्याने आधार काढण्यासाठी निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

आणखी वाचा-तळेगावातील किशोर आवारे खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा; राजकीय क्षेत्रात खळबळ

दरम्यान, शहरासह जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी आधार काढलेल्यांना त्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी मोहीम सुरू आहे. ही मोहीम ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेत केवळ आधार अद्ययावत करण्यात येत असून नव्याने आधार काढता येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारच्या सुचनेनुसार शहरासह जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी आधार काढलेल्या नागरिकांसाठी आधार अद्ययावतीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत ४५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी त्यांचे आधार अद्ययावत केले आहेत. तसेच ठरावीक केंद्रांवर नव्याने आधार काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. -डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी