मराठी नाटकाला भारतीय रंगभूमीवर आपले वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या घाशीराम कोतवाल या नाटकाचा युट्यूबवर प्रयोग रंगणार आहे. नाटकाला पन्नास वर्षे होत असल्याने संगीत नाटक अकादमीतर्फे मूळ संचातील नाटकाचे दुर्मीळ चित्रीकरण उद्या (१६ डिसेंबर) सकाळी युट्यूबवर खुले करण्यात येणार असून, नाट्यप्रेमींसाठी मूळ संचातील प्रयोगाचे चित्रीकरण पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: डेक्कन काॅलेजचे माजी सहसंचालक डाॅ. शरद राजगुरू यांचे निधन

नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकाचा पहिला प्रयोग थिएटर ॲकॅडमी या संस्थेतर्फे १६ डिसेंबर १९७२ रोजी सादर करण्यात आला होता. डॉ. जब्बार पटेल यांनी हे नाटक दिग्दर्शित केले. भास्कर चंदावरकर यांनी नाटकाचे संगीत, कृष्णदेव मुळगुंद यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. या नाटकामुळे त्या काळी राजकीय वादही निर्माण झाला होता. मात्र मराठी नाटकाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची कामगिरी घाशीराम कोतवाल या नाटकाने केली. सुरुवातीला झालेल्या विरोधानंतर गेल्या पन्नास वर्षांत भारतीय रंगभूमीवरील अभिजात कलाकृतीचा दर्जा घाशीराम कोतवाल नाटकाने प्राप्त केला. 

हेही वाचा >>>भाषा सल्लागार समिती सदस्यपदाचा डॉ. सुहास पळशीकर यांचा राजीनामा

दिल्लीत १९८९मध्ये झालेल्या नेहरू शताब्दी नाट्य महोत्सवावेळी संगीत नाटक अकादमीने घाशीराम कोतवाल या नाटकाचे चित्रीकरण करून ठेवले होते. हे चित्रीकरण आता नाटकाच्या सुवर्णमहोत्सानिमित्त खुले करण्यात येणार आहे. शुक्रवारी (१६ डिसेंबर) संगीत नाटक अकादमीच्या युट्यूब वाहिनीवर या नाटकाचे दुर्मीळ चित्रीकरण पाहण्याची संधी नाट्यप्रेमींना मिळणार आहे. https://youtu.be/DuaTm7JWprA या दुव्याद्वारे घाशीराम कोतवाल नाटकाचा मूळ संचात चित्रीत केलेला प्रयोग शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता युट्यूबवर पाहता येईल.