पुण्याचा विस्तार दिवसेंदिवस वेगाने होत असताना त्याचे आयामही बदलत आहेत. यातून या परिसराच्या विकासाच्या नवीन वाटा समोर येत आहेत. पुण्याची पुढील दिशा निश्चित करणाऱ्या या वाटा आहेत.
देशातील महानगरांचा वेगाने आर्थिक व पायाभूत विकास होत असताना पुणेही त्यात मागे नाही. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात पुण्याची कामगिरी कायमच चांगली राहिली आहे. देशातील सॉफ्टवेअर निर्यातीत पुणे तिसऱ्या स्थानी आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता पुण्यातील सॉफ्टवेअर निर्यात दुपटीने वाढून १.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. पुण्याचा आर्थिक विकास गेल्या काही वर्षांत आयटीकेंद्रित असताना त्यात आता जागतिक सुविधा केंद्रांची (जीसीसी) भर पडू लागली आहे. यातून पुण्याच्या विकासाच्या नवनवीन वाटा समोर येऊ लागल्या आहेत.
पुण्यात सध्या जागतिक पातळीवरील कंपन्यांची सुमारे ३६० जागतिक सुविधा केंद्रे आहेत. यात बँकिंग, वित्तीय सेवा व विमा क्षेत्राचा सर्वाधिक ३० टक्के वाटा आहे. त्याखालोखाल निर्मिती क्षेत्राचा वाटा २६ टक्के तर तंत्रज्ञान क्षेत्राचा वाटा २१ टक्के आहे. म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रांचा विस्तार पुण्यात वेगाने होत आहे.
पुण्याच्या विकासाची दिशा पाहिल्यास ती पूर्वेकडे दिसते. कल्याणीनगर, येरवडा, विमाननगर, खराडी आणि हडपसर भागात ७० टक्के जागतिक सुविधा केंद्रे आहेत. या परिसरात जागतिक सुविधा केंद्रासाठी चांगल्या दर्जाची कार्यालयीन जागा उपलब्ध होत आहे. देशातील एकूण कार्यालयीन जागांच्या व्यवहारात पुण्याचा वाटा ९ ते १० टक्के आहे. यामुळे पुण्यात रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत, असे जेएलएल-नरेडकोच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे.
निर्मिती क्षेत्रात पुण्याची कामगिरी पूर्वीपासून चांगली राहिली आहे. करोना संकटानंतर पुण्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये १४ हजार ५५० नवीन औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना सुरू झाल्या. करोना संकटानंतर राज्यात सुरू झालेल्या एकूण आस्थापनांपैकी २५ टक्के पुण्यात सुरू झाल्या. पुण्यात २०२० ते २०२४ या दरम्यान नोंदणी झालेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची (एमएसएमई) संख्या ९ लाख २४ हजार ९६९ असून, त्यातून ४ वर्षांत ५५ लाख २५ हजार रोजगार निर्मिती झाली आहे.
राज्यात सर्वाधिक एमएसएमई पुण्यात आहेत. याचवेळी पुणे परिसरात गोदामांची संख्याही वाढत आहेत. सध्या एकूण ६.६ कोटी चौरस फूट क्षेत्रफळाची गोदामे असून, जागतिक पातळीवरील कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांमुळे यात आणखी वाढ होत आहे. पुण्यात जर्मनी, अमेरिका आणि दक्षिण कोरियातील कंपन्यांनी निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत. यातून निर्मितीसाठी पुण्याला जागतिक पातळीवर असलेली पसंती दिसून येत आहे.
आर्थिक विकास आराखड्याचे पाऊल
मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) धर्तीवर आता पुणे महानगर प्रदेशाचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. याअंतर्गत पुणे परिसरातील उद्योगांची गरज लक्षात घेऊन १८ ठिकाणी एकात्मिक विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. नीती आयोगाकडून हा आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याचे नियोजन व अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर आर्थिक आराखडा तयार करण्याची जबाबदारी असणार आहे.
sanjay.jadhav@expressindia.com