दिनांक १० एप्रिल.. नाना पेठेतील ‘अहिल्याश्रम’चे मैदान गर्दीने भरलेले.. फटाक्यांच्या दणदणाटात गोपीनाथ मंडे यांचे रात्री नऊ वाजता सभेत आगमन झालेले.. त्यानंतर आणखी एक सभा असल्यामुळे मुंडे यांची थेट भाषणालाच सुरुवात आणि अध्र्या तासाच्या घणाघाती भाषणाने सभा जिंकून मुंडे गोखलेनगरच्या सभेला रवाना झालेले.. मुंडे यांच्या निधनाची बातमी मंगळवारी आली आणि पुण्यातल्या त्या दिवशीच्या त्या तीन सभा मुंडे यांच्या अखेरच्या सभा ठराव्यात याचे अतीव दु:ख प्रत्येक कार्यकर्त्यांला  झाले.
अनिल शिरोळे पुण्यातून खासदार म्हणून निवडून यावेत यासाठी मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केले. स्वत: बीडमधून लढत असतानाही त्यांचे दौरे राज्यभर सुरू होते आणि १० एप्रिलचा दिवस त्यांनी पुण्यासाठी दिला होता. त्या दिवशी त्यांची पहिली सभा वडगावशेरीत झाली, दुसरी सभा नाना पेठेत आणि तिसरी गोखलेनगरमधील मैदानावर. तिन्ही सभांमध्ये त्यांनी वेगवेगळे विषय मांडले. वडगावशेरीच्या सभेत त्यांनी टँकरलॉबीवर तोफ डागली, तर नाना पेठेतील सभेत कॅन्टोन्मेंट कायदा बदलाचा प्रश्न मांडला. याच सभेत त्यांनी मनसेवरही हल्ला चढवला होता. पाठोपाठ गोखलेनगरमधील सभेत पूरग्रस्त वसाहतींचे प्रश्न मांडून त्यांनी ती सभाही जिंकली होती.  
गप्पा मारायला नक्की येतो..
तीन जाहीर सभांनंतर मुंडे यांचा मुक्काम पुण्यातच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच ‘श्रेयस’मध्ये पत्रकार परिषद होती. त्यातही विजयाचा विश्वास ते सातत्याने व्यक्त करत होते. पत्रकार परिषदेनंतर परळीला जायचे का मुंबईला याचा निर्णय होत नव्हता. त्यामुळे पत्रकार परिषदेनंतर आणखी तास-दीड तास त्यांना मिळाला. तेव्हा त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांचा मूडही चांगला होता. त्यामुळे राजकीय विषयांवरच्या सर्व प्रश्नांना त्यांनी हातचे काही न राखता उत्तरे दिली. अनेक प्रश्न सेना, मनसे, भाजप यांच्यावरचे होते. मुंडे त्याबाबतही सांगत होते. या गप्पांमुळे पत्रकारही खूश झाले. पुन्हा असेच फक्त गप्पा मारायला या, असे म्हटल्यावर ‘निवडणुकीची गडबड संपू दे. पुण्यात नक्की तुमच्याशी गप्पा मारायला येतो,’ असे तेही आपणहून म्हणाले होते…