जीवनात आलेल्या खडतर प्रसंगांना धीराने सामोरा जाणारा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा उमदा मनुष्य आणि राजकारण कुशल नेता अकाली हरपला, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मी अध्यक्ष होतो. त्या वेळी मुंडे हे मुख्य कार्यवाह होते. मात्र, परिषदेचे दैनंदिन कामकाज कार्यवाह पाहत असल्याने त्या वेळी आमचा संबंध फार कमी आला. मात्र, १९९८ मध्ये परळी वैजनाथ येथील साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. तर, मुंडे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. संमेलनाच्या आदल्या दिवशी परळी स्टेशनवर रेल्वेचा अपघात झाला होता. त्यातील जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यामध्ये मुंडे यांनी पुढाकार घेतला. त्याच दिवशी कधी नव्हे तो परळीमध्ये प्रचंड पाऊस झाला होता. सगळा मांडव भिजून गेला होता. मात्र, उपमुख्यमंत्री असलेल्या मुंडे यांनी एका रात्रीत पुन्हा मांडव साफ करून घेतला आणि या अडचणींवर मात करीत कोणतेही विघ्न न येता संमेलन व्यवस्थित पार पडले, असेही मिरासदार यांनी सांगितले.
डी. एस. कुलकर्णी : कोणताही राजकीय वारसा नसताना बहुजनांशी नाते प्रस्थापित करून महाराष्ट्राच्या भूमीत पक्षाचा झेंडा भक्कम रोवणारा आणि तळागाळातल्या लोकांसाठी अनेक वर्षे संघर्ष करणारा झुंजार लोकनेता देशाला हवा असताना काळाने अचानक हिरावून घेतला.
विश्वजित कदम : विद्यार्थी आणि युवा चळवळीतून संघर्ष करीत पुढे आलेले मुंडे बहुजन समाजाचे नेतृत्व करीत लोकनेते झाले. शेतक ऱ्यांचे प्रश्न हा त्यांच्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. दिल्लीतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला.
डॉ. गजानन एकबोटे : विद्यार्थिदशेत गोपीनाथ मुंडे आयएलएस लॉ कॉलेजच्या वसतिगृहामध्ये राहत असत. त्या वेळी अॅड. बाबासाहेब चव्हाण, अनिल शिरोळे, भीमराव बडदे आणि मुंडे यांच्यासमवेत मी शिवाजीनगर भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. उपमुख्यमंत्री असताना त्यांनी अनेकदा दूरध्वनीवरून माझी आणि कुटुंबाची चौकशी केली होती. भाजप जनमानसात रुजविण्याचे काम मुंडे यांनी केले.
अभय छाजेड : भाजपचे खंबीर नेतृत्व, विरोधकांशीही स्नेहपूर्ण संबंध, भाषेवर प्रभुत्व, फर्डा वक्ता या बळावर केंद्रीय मंत्रिपदापर्यंत वाटचाल करणाऱ्या मुंडे यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणाची हानी झाली आहे.