पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ वा पदवीप्रदान सोहळा शनिवारी (१ जुलै) होणार आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले या सोहळ्याला उपस्थित राहणार असून, एप्रिल-मे २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील एकूण १ लाख २१ हजार २८१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी आकुर्डीच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अदिती कालिदास भोईटे या विद्यार्थिनीला डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदकाने गौरवण्यात येईल. विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील सभागृहात दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संपन्न होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी श्रीमती चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, विद्यापीठ अधिकार मंडळाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा >>> लोणावळ्याला जाताय? रेल्वेकडून ‘या’ लोकल तातडीने रद्द
पदवी प्रदान कार्यक्रमात एकूण १ लाख २१ हजार २८१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यात पदवीचे ९३ हजार ९८३, पदव्युत्तर पदवीचे २६ हजार ४५४, पीएच.डी.चे ४३८, एम.फिल.चे अकरा विद्यार्थी आहेत. तीस विद्यार्थी आणि चाळीस विद्यार्थिनी अशा एकूण ७० विद्यार्थ्यांना कुलपतींच्या हस्ते १०७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना कार्यक्रमात, तर उर्वरित विद्यार्थ्यांना टपालाद्वारे पदवी प्रमाणपत्र घरपोच पाठवण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.