जिल्ह्य़ातील ३१७ ग्रामंपचायतींमधील ५०३ जागांसाठी निवडणूक

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २१ डिसेंबरला मतदान, तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत सादर करता येणार आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी ७ डिसेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ९ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत शाखेने दिली.      

दरम्यान, मतदान २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. मतमोजणी २२ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील, त्या ठिकाणी आणि वेळेनुसार होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २७ डिसेंबपर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पोटनिवडणुकांचा आढावा

(तालुका, किती ग्रामपंचायतींमध्ये, किती जागांसाठी निवडणूक या क्रमाने)

वेल्हे – ४३ – ६५ , भोर – ७१ – १२१, पुरंदर – १६ – २७, दौंड – सहा – सहा, बारामती दहा – १३, इंदापूर – सहा – आठ, जुन्नर ३१ – ५५, आंबेगाव – ३३ – ५५, खेड – ३६ – ४९, शिरुर – आठ – १२, मावळ – १५ – १९, मुळशी – ३५ – ६३ आणि हवेली – सात – दहा अशा एकूण ३१७ ग्रामंपचायतींमधील ५०३ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली.