शाळेच्या बसमध्ये विद्याíथनीवर लंगिक अत्याचार झाल्याची कल्पना असतानाही, त्या विरोधात पावले उचलण्यात टाळाटाळ करणाऱ्या वानवडीतील शाळेच्या प्रशासनाविरोधात पालकांनी शनिवारी आंदोलन केले. संबंधित कर्मचारी आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
वानवडीतील एका खासगी शाळेच्या बसमध्ये सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत संबंधित विद्याíथनीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. संबंधित पालकांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यापूर्वी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे या घटनेची तक्रार केली होती. मात्र, तरीही शाळेने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याची तक्रार पालक करत आहेत. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर आणि मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पालकांनी संस्थाचालकांना घेराव घातला.
घटनेची कल्पना असतानाही, संबंधित कर्मचाऱ्यांना संस्थेने कामावर का ठेवले, घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेने काय पावले उचलली, मुख्याध्यापिकेला प्रकरणाची माहिती असतानाही वेळीच संस्थाचालक आणि पोलिसांकडे तक्रार का दिली नाही, आदी प्रश्न पालकांनी उपस्थित केले. येत्या सोमवापर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन संस्थाचालकांकडून या वेळी देण्यात आले. संस्थेने योग्य कारवाई न केल्यास, सोमवारपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
 
शिक्षण उपसंचालकांनी घेतला आढावा
घटना उघड झाल्यानंतर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन िशदे यांनी शाळेची पाहणी करून शालेय वाहतुकीसंबंधीच्या विविध मुद्दय़ांची पूर्तता करण्याचे आदेश शाळेला दिले आहेत. यामध्ये शाळेमध्ये पालक- शिक्षक संघटना आणि परिवहन समिती स्थापन करणे, बसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, शाळेच्या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबतच बसमधून प्रवास करणे, बसमध्ये जीपीआरएस यंत्रणा बसविणे, पोलिसांकडून पडताळणी झालेल्या कर्मचाऱ्यांचीच बससाठी नेमणूक करणे, बस वाहतुकीसाठीची सर्व जबाबदारी आणि शुल्क शाळेनेच घेणे आदी बाबींचा समावेश असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardians agitation demanding action on headmaster
First published on: 20-04-2014 at 03:20 IST