पुणे : गुजरातमधील खंबातच्या खाडीत उभारण्यात येणारा बहुप्रतीक्षित महत्त्वाकांक्षी ‘कल्पसार प्रकल्प’ निर्णायक टप्प्यावर आला आहे. खाडीत सुमारे ५० किलोमीटर लांबीचा बांध बांधून गोड्या पाण्याचे जलाशय निर्माण करण्यासंबंधातील हा प्रकल्प असून, याबाबतचा अहवाल केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राकडून (सीडब्ल्यूपीआरएस) लवकरच केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. विलंबामुळे या प्रकल्पाचा खर्च सुमारे एक लाख ३० हजार कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज ‘सीडब्ल्यूपीआरएस’कडून वर्तविण्यात आला आहे.
‘सीडब्ल्यूपीआरएस’चे संचालक डाॅ. प्रभातचंद्र यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पातून १० अब्ज घनमीटर पाण्याची साठवणूक करून, त्याचा ऊर्जानिर्मिती आणि सिंचनासाठी वापर केला जाणार आहे. आर्थिक आणि पर्यावरणीय अडथळ्यांमुळे, तसेच नंतर करोनामुळे प्रकल्पाचे काम रखडले होते. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, गुजरात सरकार आणि कल्पसार प्रकल्प प्राधिकरणाने ‘सीडब्ल्यूपीआरएस’ला संशोधन करून अहवाल तयार करण्याचे काम दिले आहे. त्यानुसार संशोधन सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. पुण्यातील ‘सीडब्ल्यूपीआरएस’ संस्थेत त्यासाठीच्या चाचण्या घेण्यात येत आहेत.
‘संस्थेकडून तंत्रज्ञानावर आधारित संरचनात्मक प्रकल्प बांधणी, तांत्रिकृदृष्ट्या आधुनिक उपकरणांचा वापर आणि आर्थिक क्षमता असे टप्पेनिहाय संशोधन करण्यात येत आहे. संशोधनाचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच हे संशोधन पूर्ण करून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे सविस्तर अहवाल पाठविला जाणार आहे,’ असे डाॅ. प्रभातचंद्र यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘या प्रकल्पाला बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. खाडीतील पाण्याच्या लाटांमुळे तेथे येणारे नद्यांचे पाणी खारे होत असून, ते शुद्ध करण्यासाठी खाडीच्या मध्यभागी हा बांध उभारण्यात येत आहे. या ठिकाणी तीव्र वेगाने येणाऱ्या लाटा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थोपवून पाणी खाडीत मिसळण्यापूर्वीच त्यावर प्रक्रिया केली जाईल.’
लाटांसाठी खास दगड
‘खंबातच्या खाडीत येणाऱ्या ८ मीटर उंचीच्या लाटांचा सामना करण्यासाठी विशेष दगडांचा वापर केला जाणार आहे. या दगडांचे वजन ४० टन असून, त्यांची रचना ‘ॲक्रोपोड’ आणि ‘टेट्रापोड’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. दगडांची झीज, त्यावरील परिणाम याबाबतचे संशोधन महत्त्वाचे असून, याबाबतही चाचण्या करण्यात येत आहेत,’ असे डाॅ. प्रभातचंद्र यांनी सांंगितले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
सौराष्ट्रातील १० लाख हेक्टर जमिनीसाठी सिंचन सुविधा
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि औद्योगिक विकासाला चालना
धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र आणि भावनगर-भरूच औद्योगिक कॉरिडॉरला थेट फायदा
१० हजार मेगावॅट ऊर्जानिर्मिती