सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा शिवसैनिकांना कानमंत्र
‘तालमीत उतरण्यासाठी आठ दिवसाची कसरत पुरेशी नाही’, ‘जो मत देत नाही, तोच विजयी झाल्यानंतर हार घालण्यासाठी येतो’, ‘पुढे-पुढे करतो, तो ‘डुप्लीकेट’ असतो’, ‘राजकीय हवामान पाहून काम करा’, ‘चहापेक्षा किटली गरम होऊ देऊ नका’, कार्यालयांमध्ये बसा अन् आलेल्यांची कामे करा, यासारखे अनेक मुद्दे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी निगडीत शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीसाठी कानमंत्र दिला. राष्ट्रवादी म्हणजे ‘गब्बरसिंग’ असल्याचे सांगत आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘वध’ करा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्राधिकरणात पाटीदार भवनातील शिवसेना मेळाव्यात पाटील यांनी शिवसैनिकांनी मार्गदर्शन केले. जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे आदींसह मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांचे व्याख्यानही झाले.
पाटील म्हणाले की, मंत्री होईन असे वाटले नव्हते. चांगला कलावंत होतो, गायक होतो. मात्र, ते नाटक सोडून राजकीय रंगमंचावर आला आहे. आधी पानटपरी चालवायचो. राजकीय वारसा नव्हता. तरीही ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, आमदार आणि आता नामदार झालो. सामान्य कार्यकर्त्यांचा असा प्रवास शिवसेनेतच होऊ शकतो. ज्याच्यावर खटले नाहीत, तो शाखाप्रमुख नाही. ज्याला लढणे माहिती नाही, तो शिवसैनिक नाही. जे पोलीस आपल्याविरोधात खटले दाखल करत होते, तेच बंदोबस्तासाठी पुढे-मागे आहेत. शिवसेना संपणार असे म्हणणाऱ्यांची पुढे वाईट अवस्था झाली. खानदेशातून या ठिकाणी स्थायिक झालेल्या नागरिकांनी शिवसेनेच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भाजपशी युती असो-नसो फरक पडणार नाही’
भाजप-शिवसेनेच्या संभाव्य युतीच्या विषयावर सर्वच वक्तयांनी आपापल्या दृष्टिकोनातून भाष्य केले. मात्र, अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, असे स्पष्ट करण्यात आले. भाजपचे शहरात काहीही अस्तित्व नसल्याची टिप्पणी गौतम चाबुकस्वार यांनी केली. युती असो किंवा नसो, फरक पडणार नाही, असे शिवाजीराव आढळराव यांनी निक्षून सांगितले. भाजप कार्यकर्त्यांविषयी आकस नाही, समविचारी पक्षासोबत जाण्याच्या विरोधात नाही, असे श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले. आपण ताकदवान असल्याने भाजपकडून युतीचा प्रस्ताव आल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil guide workers in shiv sena rally
First published on: 25-07-2016 at 02:58 IST