बंगळुरूच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’चे संचालक डॉ. बलदेव राज आणि पुण्यातील ‘आयसर’ संस्थेचे संचालक डॉ. के. एन. गणेश यांना या वर्षीचे ‘एच. के. फिरोदिया’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेचा ‘विज्ञान रत्न पुरस्कार’ डॉ. बलदेव राज यांना तर ‘विज्ञान भूषण पुरस्कार’ डॉ. के. एन. गणेश यांना प्रदान करण्यात येणार आहे. अनुक्रमे २ लाख व १ लाख रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. ९ ऑक्टोबरला सायंकाळी सव्वासहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होईल. अमेरिकेतील ‘जेटीआय’ कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सदानंद जोशी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अणुऊर्जेतील ‘फास्ट ब्रीडर टेस्ट रीअ‍ॅक्टर’ आणि ‘प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रीअ‍ॅक्टर’च्या तंत्रज्ञानात डॉ. बलदेव यांचे मोठे योगदान आहे. रोबो तंत्रज्ञान आणि आरोग्य या विषयातही त्यांनी संशोधन केले आहे. डॉ. के. एन. गणेश यांचे संशोधन जनुक तंत्रज्ञानातील असून ‘डीएनए पेपटाईड्स’ तंत्रज्ञानात त्यांचे विशेष योगदान आहे.