शरद पवार यांचा पुढाकार; व्यवस्थापन व कामगारांचे बैठकीकडे लक्ष

‘साहेब, कंपनी वाचवा’, असे साकडे कामगारांनी घातल्यानंतर ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी िपपरीतील एचए कंपनीच्या प्रश्नात पुन्हा लक्ष घातले. त्यानुसार, पवारांच्या पुढाकाराने दिल्लीत शुक्रवारी (८ जुलै) मंत्रिगटाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीकडे कंपनी व्यवस्थापन व कामगारांचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या मेळाव्यासाठी २४ जूनला पवार शहरात आले होते. त्या वेळी एचएच्या कामगारांनी कंपनी वाचवा, अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. कामगार पुढाऱ्यांच्या राजकारणामुळे नाराज असलेले पवार बऱ्याच दिवसांपासून ‘एचए’पासून चार हात दूर होते. मात्र, त्यांनी पुन्हा लक्ष घालण्याचे मेळाव्यात बोलताना मान्य केले. त्यानुसार, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून सद्य:स्थितीची माहिती घेतली होती. त्याच वेळी या प्रश्नाशी संबंधित अरुण जेटली, नितीन गडकरी आणि अनंतकुमार या तीन केंद्रीय मंत्र्यांशी संपर्कही साधला होता. संयुक्त बैठक घेण्याचे तेव्हाच ठरले होते. त्यानुसार, शुक्रवारी दिल्लीत ही बैठक होत आहे. गेल्या २० महिन्यांपासून एचएच्या कामगारांचे पगार झालेले नाहीत. पुनर्वसन योजनांचे स्वरूप काय असले पाहिजे, पीपीपीच्या प्रस्तावाचे काय करायचे, आदी मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.   त्याचप्रमाणे शहर भाजपने कंपनीची ६० एकर जागा शासनानेच ताब्यात घ्यावी आणि तेथे शासकीय कार्यालये उभारावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मुद्दय़ाचा विचारही बैठकीत होणे अपेक्षित आहे.