भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासह सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. शिवाय, आपण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते, ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वानी माझी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे.

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

“आमच्याकडे कोणी प्रस्ताव दिला नाही. राष्ट्रवादीला जर कोणी प्रस्ताव दिला असेल तर मला थोडफार तरी माहीत असेल. राष्ट्रवादीचे सगळे निर्णय घेण्याचा आमच्या अन्य लोकांना अधिकार आहे परंतु तरीही ते माझ्या कानावर घालतात. अशोक चव्हाण जे बोलले ते मी कधीही ऐकलं नाही.” असा खुलासा केला.

युती सरकारच्या काळातच शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ता स्थापनेचा प्रस्ताव; अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांना “अशोक चव्हाण यांनी असं म्हटलं आहे की काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सरकार बनवावं असा २०१४ मध्येच प्रस्ताव आला होता. जेव्हा शिवसेना सत्तेत सहभागी झाली नाही. मात्र शरद पवारांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि शिवसेनची कोंडी झाली. जर त्याचवेळी सरकार झालं असतं तर थोडीशी राजकीय परिस्थिती वेगळी असती.” असं सांगत यावर प्रतिक्रिया विचारण्यात आल्यानंतर त्यांनी वरील खुलासा केला.

संघर्ष होतो पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे –

याचबरोबर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या शिंदे व ठाकरे गटाती संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवारांनी “दुर्दैवाने एका पक्षाचे दोन भाग झाले आणि त्यामधून एक स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं. गंमत अशी आहे की या गोष्टी होतात. संघर्ष होतो पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. ही मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते काही राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. राज्याचे जे जबाबदार लोक आहेत, त्या लोकांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकली पाहिजे आणि मग ती पावलं टाकण्याची जबाबदारी ही आम्हा लोकांसारखे वरिष्ठ लोकांवर असेल. त्याहीपेक्षा राज्याचे जे प्रमुख आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत. ते पक्षाचे प्रमुख असतील पण महाराष्ट्राच्या १४ कोटी लोकांचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे. अपेक्षा अशी करूयात की यामधून शेवटी जी काही उद्या ते मांडणी मांडतील, त्यात कटूता नसेल अशाप्रकारची मांडणी दोन्ही बाजूंनी केली तर राज्यातील वातावरण सुधारायला मदत होईल.” असं मत मांडलं.

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यास राष्ट्रवादीचे समर्थन? –

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळव्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत केली जात आहे, असा भाजपाकडून आरोप होत आहे. यावर पवार म्हणाले. “या सगळ्या गोष्टींमध्ये राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे आणि दुसरा कार्यक्रम शिंदेंच्या सेनेचा आहे. त्यामध्ये अन्य पक्षाने येण्याचं काही कारण नाही.”