मंगळवार पेठेतील महापालिकेच्या गुरूदेव रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याप्रकरणी मुख्यध्यापिका आणि खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या कंत्राटदाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेने मुलांना दिलेली उसळ व भात खराब असल्याचा शेरा नोंदवहीत लिहून ठेवला. पण, ते अन्न विद्यार्थ्यांना देऊ नये असे सांगितले नसल्याचे समोर आले आहे.
कंत्राटदार श्याम साधू ससाणे (वय ४१, रा. रामटेकडी, हडपसर) आणि मुख्याध्यापिका रत्नमाला अविनाश वंजारी (वय ४५, रा. कसबा पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सहायक शिक्षण प्रमुख विजय आवारी (वय ४२, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवार पेठेत महापालिकेच्या शिक्षण मंडळाची रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कडधान्याची उसळ देण्यात आली होती. ही उसळ खाल्ल्यानंतर चौथी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांना उलटय़ा, मळमळ होऊ लागली. त्यामुळे १९ विद्यार्थ्यांना तत्काळ कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर अकरा जणांस घरी सोडण्यात आले आहे, तर सहा जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. ही उसळ ससाणे याने रामटेकडी येथून बनवून आणली होती. मुख्याध्यापिका वंजारी यांनी महापालिकेच्या नियमानुसार ससाणे यांनी आणलेली उसळीची चव घेऊन उसळीला उग्र वास येत असल्याचा शेरा त्यांनी नोंदवहीत करून ठेवला. पण, ती उसळ विद्यार्थ्यांना देऊ नये, अशी सुचना केली नाही. ही उसळ विद्यार्थ्यांना दिल्यानंतर त्यांना उलटय़ा सुरू झाल्या. याप्रकरणी हयगय करून शालेय विद्यार्थ्यांना शारीरिक अपाय व विषबाधा होण्यास कारणीभूत झाल्या. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एम. गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.