रक्तदाब, रक्तशर्करा, पायदुखी-अंगदुखी, उलटय़ा-जुलाब अशा तक्रारी घेऊन गणेश विसर्जनादिवशी मिनी हॉस्पिटलमध्ये आलेल्या १२०० पोलीस आणि गणेशभक्तांची तपासणी करण्यात आली. तर, उत्सवकाळामध्ये सुरू ठेवण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये २,५२० रुग्णांची तपासणी करून मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली.
निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे विश्रामबाग-फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटल उपक्रमाला पोलीस आयुक्त के. के. पाठक, अपर पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, उपायुक्त मकरंद रानडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. जयप्रकाश राठी, राधेश्याम लाहोटी, भूषण राठी, सुजाता राठी, संदीप महामुनी, कुंतल देशमुख, किशोर वरपे, पूजा राठी या डॉक्टरांच्या पथकासह संस्थेचे जयेश कासट, आनंद भट्टड, प्रवीण पवार, स्वप्नील देवळे, भारती होले, विवेक अहिरे यांनी हा उपक्रम यशस्वी केला. सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये सर्दी-खोकला, उलटय़ा-जुलाब यांसारख्या तक्रारी घेऊन येणाऱ्या पोलीस आणि गणेशभक्तांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवून मोफत औषधे दिली गेली. त्यामुळे आम्ही बंदोबस्तासाठी सक्षम राहिलो, अशी भावना पोलिसांनी व्यक्त केली.
मॉडर्न विकास मंडळातर्फे विजय चित्रपटगृहाजवळील शेडगे विठोबा चौक येथे सुरू ठेवण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय सेवा केंद्रामध्ये ४० गणेशभक्तांवर उपचार करण्यात आले. संदीप बुटाला, तुषार जगताप, राजेंद्र खेडेकर, धर्मेद्र शहा, ज्योती निकम, किशोर चिपोळे, डी. वाय, पवार, लीना हतेकर आणि विनित धोत्रे या डॉक्टरांनी नागरिकांवर उपचार केले.
विश्रामबाग-फरासखाना पोलीस ठाण्यांच्या आवारातील
विकार आणि तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या :
मधुमेह आणि रक्तदाब – १३५०
पोटदुखी – ८०
थंडीताप – २००
उलटय़ा-जुलाब – १५०
कंबरदुखी-सांधेदुखी – २००
चक्कर येणे-डोकेदुखी – १६०
घाम येणे, अस्वस्थ वाटणे, छातीत दुखणे – १८०
ई. सी. जी. – १००
रक्तशर्करा तपासणी – ३००