पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात सध्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथे गारांचा पाऊस झाला असून तब्बल अर्धा तास या पावसाने गावाला झोडपून काढले. दुपारी तीनच्या सुमारास पावसाने परिसरात हजेरी लावली. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागिरकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सुत्रांकडून कळते. येथील शेतकरी सध्या कांद्याची लागवड करण्यात व्यस्त आहेत. तर, टोमॅटो आणि पपई तोडणीस आली आहे. या पिकांवर याचा परिणाम होणार आहे.

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील बहुतांश भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. परंतू, या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुणे जिल्हातील शिरूर, आंबेगाव तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर चाकण एमआयडीसीत देखील वादळी वाऱ्यासह सोमवारी जोरदार पाऊस झाला. शिरूर, आंबेगाव तालुक्यातील जांबूत, चांडोह, पारगाव, अवसरी, लाखणगाव या गावांना वादळीवारा आणि ढगाच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दरम्यान, मावळातही संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.

सोमवारी भारतीय हवामान विभागाने यावर्षी सरासरीच्या ९७ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, त्यापूर्वीच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागा आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.