पुणे, मुंबई : मुसळधार कोसळून अवघ्या काही दिवसांत महिन्याची सरासरी गाठलेल्या पावसाने आता राज्यातील बहुतेक भागांत दडी मारल्याने  उन्हाचा चटका वाढला असून तापमानातही वाढ झाली आहे. राज्याच्या काही भागांत टळटळीत ऊन पडत असल्याने कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढला आहे. जळगाव, अकोला येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्याशिवायही राज्याच्या इतर भागांतही कमाल तापमान ३० अंश सेल्सअसपेक्षा अधिक आहे. तापमानवाढीबरोबरच मुंबईसह किनारपट्टीच्या भागांत आद्र्रता वाढल्याने शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून दहा ते बारा दिवस अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. काही भागांना अतिवृष्टीने झोडपून काढले. विदर्भ आणि मराठवाडय़ात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसाने सरासरी ओलांडली असून, सरासरीच्या तुलनेत राज्यात सुमारे ४० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या आठवडय़ापासून राज्यातील बहुतेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे.

अंदाज काय?

येत्या २४ तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात दोन दिवस काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. मराठवाडय़ात दोन दिवसांनंतर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली.